नमो अ‍ॅपमुळे भाजपामध्ये घाबरगुंडी; अनेक खासदारांची उडणार दांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:46 AM2019-01-15T10:46:25+5:302019-01-15T10:48:00+5:30

उमेदवारी देताना नमो अ‍ॅपवरील डेटाचा आधार घेतला जाणार

Namo App Survey creates tension among Bjp Mps | नमो अ‍ॅपमुळे भाजपामध्ये घाबरगुंडी; अनेक खासदारांची उडणार दांडी

नमो अ‍ॅपमुळे भाजपामध्ये घाबरगुंडी; अनेक खासदारांची उडणार दांडी

Next

नवी दिल्ली: नमो अ‍ॅपमुळे केल्या जात असलेल्या सर्वेक्षणामुळे भाजपाच्या अनेक खासदारांची झोप उडाली आहे. मोदींनी नमो अ‍ॅपच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातील तीन प्रमुख नेत्यांची नावं सुचवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी नमो अ‍ॅपवर 'पीपल्स पल्स' नावानं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देताना या माहितीचा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यामुळे अनेक खासदार सध्या चिंतेत आहेत. 

केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजना लोकांपर्यत पोहोचवा, अशा सूचना मोदींनी अनेकदा खासदारांना दिल्या आहेत. याशिवाय सरकारी आकडेवारीच्या मदतीनं नमो अ‍ॅपवर सक्रीय राहण्याच्या सूचनादेखील खासदारांना वारंवार देण्यात आल्या आहेत. नमो अ‍ॅपवरील एक प्रश्न खासदारांना अस्वस्थ करतो आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघातील तीन लोकप्रिय नेते कोणते, या प्रश्नानं भाजपाच्या खासदारांची झोप उडाली आहे. उमेदवारी देताना नमो अ‍ॅपवरील हा प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

अधिकाधिक लोकांनी नमो अ‍ॅपवरील सर्वेक्षणात सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. यासाठी मोदींनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. 'तुमचा अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दिलेल्या अभिप्रियांमुळे अनेक निर्णय घेताना आम्हाला मदत होईल,' असं आवाहन मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं होतं. भाजपा अध्यक्ष अमित शहांनीही ट्विटरच्या माध्यमातून अशाच प्रकारचं आवाहन केलं होतं. तुमच्या मतदारसंघातील मुद्दे थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवा, असं शहांनी म्हटलं होतं. 

Web Title: Namo App Survey creates tension among Bjp Mps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.