पोलिसांनाच दिली 'नमो फूड' पॅकेट्स, निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:59 IST2019-04-11T13:58:49+5:302019-04-11T13:59:39+5:30
नमो फूड वाटपप्रकरणी नोएडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक वैभव कृष्णा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पोलिसांनाच दिली 'नमो फूड' पॅकेट्स, निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
नवी दिल्ली - गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघात नोएडा येथे नमो फूड वाटण्यात येत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनाच हे नमो फूड पॅकेट वाटण्यात आले आहे. त्यामुळे हे फूड पॅकेट वादात सापडले आहे. एका राजकीय पक्षाकडून ही जेवणाची पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशचे निवडणूक आयुक्त वेंकटेश्वर लू यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच याप्रकरणी नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तपशीलही मागविला आहे.
नमो फूड वाटपप्रकरणी नोएडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक वैभव कृष्णा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नमो फूड पॅकेज पोलिसांना कुठल्याही राजकीय समुदायाकडून वाटण्यात आले नसून ही अफवा असल्याचे कृष्णा यांनी म्हटले. तसेच, पोलिसांसाठी नमो फूड हे नमो फूड पॅकेटमधून विकत घेण्यात आले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचा याच्याशी संबंध नसल्याचे कृष्णा यांनी सांगितले. खासगी दुकानातून फूड पॅकेट खरीदी करू नये, असा कुठलाही आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही, किंवा तसे बंधनही घालण्यात आले नाही. तर, केवळ याचा दुकानात खरेदी करावे, असाही कुठला आग्रह नाही, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील 8 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, मुजफ्फरनगर, कैराना, सहारनपुर, बागपत, बिजनौर आणि मेरठ या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील काही ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ही फूड पॅकेट वाटण्यात आल्याची चर्चा नोएडामध्ये पसरली आहे. दरम्यान, देशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून 91 मतदारसंघात मतदानप्रक्रिया सुरू आहे. 18 एप्रिल रोजी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे.