सोशल मीडियावर नमो नमो, जगभरात मोदी अव्वल
By admin | Published: May 28, 2017 07:58 AM2017-05-28T07:58:41+5:302017-05-28T07:58:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर चार कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्ससह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर चार कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्ससह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले असून ही बाब नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमधून समोर आली आहे.
याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत. या चार कोटी फॉलोअर्समध्ये मोदी यांच्या पेजला तीन कोटी, तर पंतप्रधान कार्यालयाच्या पेजला एक कोटी फॉलोअर्सचा समावेश आहे. मोदी यांनी मे2014 मध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली त्यावेळी त्यांच्या पेजला केवळ 40 लाख फॉलोअर्स होते. हा आकडा तीन वर्षांमध्ये चार कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
मोदी यांनी फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. सोशल मिडियावर मोदी यांच्या डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत या योजना लोकप्रिय ठरल्या आहेत. सार्वजनिक प्रशासनामध्ये सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याची ही नवीन पद्धत आहे, अशा प्रतिक्रिया फेसबुकचे भारतातील संचालक अंखी दास यांनी सांगितले आहे.
मोदी यांच्यानंतर भारतात सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जनरल व्ही के सिंह, पियुष गोयल आणि अरुण जेटली यांचा समावेश आहे. केंद्रीय महिती व प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय यांच्याकडून फेसबुकद्वारे लोकांशी संवाद साधून, फेसबुक लाईव्हच्या सेवेचा वापर करून सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. दास यांच्या सांगण्यानुसार, फेसबुकद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत जवळपास सहा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.