नमो टीव्ही सुरूच; भाजपने घेतली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 07:15 AM2019-04-12T07:15:29+5:302019-04-12T07:15:37+5:30
नमो टीव्हीवरील कार्यक्रम हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार काँग्रेस व आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती.
नवी दिल्ली : नमो टीव्ही हा आमच्याच नमो अॅपचा भाग असून, त्याचे प्रक्षेपण टेलीकास्ट न करता वेबकास्ट केले जाते, असे भाजपने गुरुवारी मान्य केले आहे. मात्र नमो टीव्हीवर दाखवली जाणारी भाषणे व मुलाखती यांच्यासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नमो टीव्हीच्या लोगोसाठी संमती घेण्यात आली होती, त्यावर कोणताही कार्यक्रम, भाषणे मुलाखती दाखवण्यासाठी आमची संमती घेण्यात आलेली नाही, असे निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नमो टीव्हीवरील कार्यक्रम हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार काँग्रेस व आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने बुधवारी काढलेल्या आदेशानुसार नमो टीव्ही दाखवणे गैर होते. तरीही आम्ही कार्यक्रम टेलीकास्ट नव्हे, तर वेबकास्ट करतो आणि त्यासाठी आम्ही स्लॉट विकत घेतला आहे, असा दावा भाजपने केला आहे. मात्र त्यासाठी डीटीएचचा स्लॉट घेता येतो का, हे स्पष्ट झालेले नाही.
आयोगाच्या कालच्या आदेशानंतर गुरुवारी सकाळी तो दिसणे बंद झाले होते. मात्र नंतर पुन्हा नमो टीव्ही दिसणे सुरू झाले. ग्राहकांची संमती न घेता मोफत कार्यक्रम दाखवणेही बेकायदा आहे, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र आम्ही स्लॉट घेतला असल्याने त्यावरील कार्यक्रम ग्राहकांना दिसतात, असे भाजपचे म्हणणे आहे. आता नमो टीव्हीबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.