सांत्वनासाठी नाना सुशांतच्या कुटुंबाला भेटले; बॉलिवूडमधील गटबाजीवर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:02 AM2020-06-29T10:02:17+5:302020-06-29T13:42:08+5:30

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी नाना पाटेकर पाटण्यात

nana patekar meets sushant singh rajput family talks about groupism in bollywood | सांत्वनासाठी नाना सुशांतच्या कुटुंबाला भेटले; बॉलिवूडमधील गटबाजीवर स्पष्टच बोलले

सांत्वनासाठी नाना सुशांतच्या कुटुंबाला भेटले; बॉलिवूडमधील गटबाजीवर स्पष्टच बोलले

Next

पाटणा: अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सुशांतच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून नानांनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. जवळपास अर्धा तास नाना पाटेकर सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होते. 

सुशांतच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलेल्या नाना पाटेकर यांनी सीआरपीएफच्या ४७ व्या बटालियनच्या कॅम्पसलादेखील भेट दिली. त्यावेळी त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'सुशांत सिंह अतिशय अद्भुत कलाकार होता. तो खूप सुंदर अभिनय करायचा. तो आता या जगात नाही, यावर विश्वासच बसत नाही. मी माझा मुलगा गमावल्यासारखं वाटतंय. सुशांत आता आपल्यात नाही, हे सत्य अजूनही मला पचवता येत नाही. सुशांत लहान होता. अजून ३० वर्षे तो काम करू शकत होता. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सुशांतचं यश प्रस्थापितांना खुपत असल्यानं त्याला एकटं पाडण्याचे, त्याला चित्रपट मिळू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आरोप झाले. त्यावरही नानांनी भाष्य केलं. 'बॉलिवूडसाठी मीदेखील आऊटसाईडर होतो. मात्र मी माझं स्थान निर्माण केलं. मला राग येतो. मी चिडतो. मात्र असं असूनही बॉलिवूडनं मला स्वीकारलं,' असं नाना म्हणाले.

बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होत असल्याचा मुद्दादेखील सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आला. त्यावर नानांनी अगदी स्पष्टपणे भाष्य केलं. 'मी कधीच इंडस्ट्रीत अव्वल नव्हतो. आताची परिस्थिती तर आणखी बदलली आहे. मी कोणत्याही पार्टीला जात नाही. मला तोंडावर बोलण्याची सवय आहे. बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे. मात्र तुमच्याकडे कौशल्य असल्यास तुम्ही तुमचं स्थान निर्माण करू शकता. कोणी कितीही गटबाजी केली, तरी तुम्ही चांगलं काम करत राहू शकता,' असं नाना म्हणाले. 

सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाहीवर टीका होत आहे. त्यामुळेच अनेक बड्या कलाकारांनी सुशांतच्या कुटुंबीयांशी संवाद साधलेला नाही. अशा परिस्थितीत नाना पाटेकरांनी काल सुशांतच्या कुटुंबीयांची पाटण्यात भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या कुटुंबासोबत संवाद साधत त्यांना धीर दिला. ताणतणावामुळे नैराश्य आल्यानं सुशांतनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. त्यात काही प्रॉडक्शन हाऊसेसचादेखील समावेश आहे. याबद्दल माध्यमांनी नाना पाटेकर यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यावर भाष्य करणं टाळलं.

मला माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटतंय; सुशांतच्या मृत्यूबद्दल नानांकडून दु:ख व्यक्त

Video: तेव्हा मला सुशांतमध्ये आत्मविश्वास दिसला नव्हता, शोएब अख्तरने सांगितली आठवण

Web Title: nana patekar meets sushant singh rajput family talks about groupism in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.