नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 06:33 AM2019-01-26T06:33:00+5:302019-01-26T06:33:14+5:30
प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे.
नवी दिल्ली : प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे. यापैकी नानाजी देशमुख व भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. यंदा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ दिले जाईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती, पण तीन वेगवेगळ््या क्षेत्रांतील नामवंतांचा सन्मान करण्याचे केंद्र सरकारने ठरविले.
नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कडोली गावी झाला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात गेले आणि तिथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिट्स पिलानीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. नंतर त्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेशात कामाला सुरुवात केली. पुढे जनसंघ व जनता पार्टी यांमध्येही ते सक्रिय होते. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते. काही काळ ते खासदारही होते. वयाच्या ६0 व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकुटमध्ये जाऊ न आदिवासी व मागास समाजात काम सुरू केले. त्यांचे निधन ९३ व्या वर्षी २0१0 मध्ये झाले.
तर आसाममध्ये १९२६ साली जन्मलेल्या भूपेन हजारिका यांनी आसामीच नव्हे, तर अनेक बंगाली व हिंदी चित्रपटांना व हजारो गीतांना संगीत दिले. त्यांच्या सर्व गीतांवर लोकसंगीताचा मोठा प्रभाव होता. ते स्वत: गीतकार, गायक, दिग्दर्शकही होते. त्यांना संगीतासाठीचे अनेक पुरस्कार मिळाले असून, ‘पद्मभूषण’ व ‘पद्मविभूषण’ या पुरस्कारानेही यापूर्वी सन्मानित करण्यात आले होते. भूपेन हजारिका यांची ‘दिल हूं हूं करे’ ‘गंगा बहती है क्यूं’ आदी गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत. त्यांचे २0११ साली मुंबईत निधन झाले.
प्रणव मुखर्जी यांची माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते म्हणून ओळख सर्वांना आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळापासून अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. ते २0१२ ते २0१७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर ते रा. स्व. संघाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते. तिथेही मुखर्जी यांनी आपले म्हणणे संघ कार्यकर्त्यांसमोर ठामपणे मांडले होते. भारतरत्न पुरस्कार हा फारच मोठा सन्मान असून, अतिशय विनम्रपणे मी तो स्वीकारत आहे, असे प्रणवदा आज म्हणाले.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत म्हणाले की, हा एका काँग्रेसजनाचाही सन्मान आहे.
>या नामवंतांचाही ‘भारतरत्न’ने झाला सन्मान
महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
जे. आर.डी. टाटा, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख