नांदगावी मराठा वज्रमूठ
By Admin | Published: December 30, 2016 11:04 PM2016-12-30T23:04:26+5:302016-12-30T23:05:11+5:30
स्वयंशिस्तीचे दर्शन : आरक्षणासह इतर मागण्यांचा समावेश
नांदगाव : नागपूर येथील यशस्वी मोर्चानंतर जिल्ह्यातील पहिलाच मोर्चा ठरलेल्या नांदगाव तालुकास्तरीय मराठा क्रांती मोर्चाने तालुकावासीयांचे लक्ष वेधून घेतले. आज सकाळपासूनच महाविद्यालयाच्या दिशेने मोर्चेकरी गर्दीने जाताना दिसत होते. महाविद्यालयाच्या आवारात जमलेल्या गर्दीला आयोजक सूचना देत होते़ या मोर्चात सहभागी होण्यासाठी कुणी छत्रपती शिवाजी महाराज बनले तर कुणी जिजामाता अशा लक्षवेधी वेशभूषेत पेहराव करून तर कुणी अश्वावर स्वार होत आपला सहभाग नोंदवीत होते. या मोर्चाला दुपारी १ वाजता महाविद्यालयापासून प्रारंभ झाला. मोर्चा लक्षात घेता पोलिसांनी नांदगावमध्ये येणाऱ्या सर्वच राज्यमार्गाकडची वाहतूक परस्पर बाहेरून वळविल्याने मोर्चा सुरळीत पार पडला. मालेगाव रस्त्याने निघालेल्या या मोर्चात महिला, युवती, विद्यार्थी यांच्यासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील मंडळी सहभागी झाली होती. काळे वस्त्र परिधान केलेल्या या मोर्चात भगवे घेत ध्वज, अश्वावर स्वार झालेल्या युवती, कोणत्याही प्रकारची घोषणा न देता स्वयंंशिस्तीत निघालेला हा मोर्चा शनिमंदिर, महावीर मार्ग, शिवस्फूर्ती बाजार रस्ता, गांधी चौक, आंबेडकर चौकमार्गे जुन्या तहसील कार्यालयाजवळ धडकला. मोर्चा शिवस्फूर्ती मैदानात पोहोचला तेव्हा त्याचे दुसरे शेवटचे टोक शनि मंदिर व जैन धर्मशाळेजवळ होते. जवळपास वीस हजारांहून अधिक जण मोर्चात सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. जुन्या तहसीलजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ व्यासपीठ उभारण्यात आले होते. याठिकाणी व्यासपीठावर एकूण बारा युवती व लहान मुली स्थानापन्न झाल्या होत्या. स्नेह जाधव, श्रद्धा आहेर, दिव्या महाले, दर्शना भोसले, यशस्वी जाधव, हर्षदा रिंढे, आश्विनी जगदाळे यांनी सध्या मराठा समाजातील स्थितीवर भाष्य करीत आता मराठा पेटला असून, राज्यकर्त्यांनी त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा आतापर्यंत मूक मोर्चा काढणारा समाज बोलू लागेल व रस्त्यावर उतरला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. सभेचे संचालन अनिल काकडे यांनी केले. वक्त्यांची भाषणे संपताच राष्ट्रगीत झाले व मोर्चाचा समारोप तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांना तेजस्विनी अहेर, धनश्री अहेर, शिवानी इघे, ऋतुजा अहेर, जागृती वाघ यांच्या हस्ते निवेदन देऊन करण्यात आला. (वार्ताहर)