नारदमुनी म्हणजे प्राचीन काळातील गुगलच; भाजपाचे आणखी एक नेते पोहोचले पुराणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 12:22 PM2018-04-30T12:22:03+5:302018-04-30T12:22:03+5:30
भाजपच्या नेत्यांमध्ये अकलेचे तारे तोडण्याची स्पर्धा
अहमदाबाद: महाभारत काळात इंटरनेट होतं, असं विधान करुन त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी अकलेचे तारे तोडले. यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नवी मुक्ताफळं उधळली आहेत. गुगलला ज्याप्रकारे संपूर्ण संपूर्ण जगाची माहिती आहे, तशाच प्रकारे नारदमुनींना संपूर्ण जगाची माहिती असायची, असं रुपानी यांनी म्हटलंय. 'नारदमुनी अशी व्यक्ती होती, जिच्याकडे संपूर्ण जगाची माहिती होती. ते माहितीवर काम करायचे. मानवतेच्या भल्यासाठी ते सर्व माहिती गोळा करायचे आणि या कामाची खूप आवश्यकता होती,' असं रुपानी म्हणाले.
अहमदाबादमध्ये आरएसएसच्या शाखा विश्व संवाद केंद्राकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रुपानी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 'गुगल नारदमुनींप्रमाणेच माहितीचा स्रोत आहे. गुगलकडे जगात घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती असते. नारदमुनींकडेदेखील अशाच प्रकारे संपूर्ण जगाची माहिती असायची,' असं रुपानी यांनी म्हटलं. रुपानी यांच्या आधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी, महाभारताच्या काळात इंटरनेट होतं, असा अजब दावा केला होता. अमेरिका किंवा इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशानं नव्हे, तर भारतानं शेकडो वर्षांपूर्वीच इंटरनेटचा शोध लावला होता, असं देब यांनी म्हटलं होतं.
भाजपाचे मुख्यमंत्री अनेक वादग्रस्त विधानं करत असताना केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही स्टिफन हॉकिंग यांच्या मृत्यूनंतर हास्यास्पद विधान केलं होतं. 'ब्रह्मांडाचा अभ्यास करणाऱ्या हॉकिंग यांनी वेदांमध्ये असलेला सापेक्षतावादाचा सिद्धांत आईनस्टाईन यांच्या e=mc^2 पेक्षा जास्त चांगला असल्याचं म्हटलं होतं,' असं हर्षवर्धन यांनी म्हटलं होतं.