सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंग वाराही ब्रिगेड'ची स्थापना; पवन कल्याण यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 05:44 PM2024-11-03T17:44:45+5:302024-11-03T17:46:09+5:30
पवन कल्याण यांच्या घोषणेला भाजपचा पाठिंबा.
Pawan Kalyan Narasimha Varahi Brigade: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंह वाराही विंग/ब्रिगेड' (Narasimha Varahi Brigade) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांचा पक्ष जनसेना आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सनातन धर्माच्या रक्षणासाठी ही नरसिंह वाराही विंग स्थापन करत आहे. विशेष म्हणजे, त्यांना या कामासाठी भाजपची साथ मिळाली आहे.
'सनातनविरोधी पोस्ट खपवून घेणार नाही'
याबाबत घोषणा करताना पवन कल्याण म्हणाले की, "हिंदू मंदिरांना भेटी देताना आणि सनातन धर्माचे पालन करताना काही मूल्ये जपली पाहिजेत. सनातन धर्माशिवाय देश तसाच राहणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सनातन हा केवळ देशासाठीच नव्हे, तर जगासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे."
"I respect all religions, but I stand firm on my faith. Those who criticize Sanatana Dharma on social media or speak disrespectfully about it will have to face the consequences. Thus, I am establishing a dedicated wing within our party named the ‘Narasimha Varahi Brigade’ for the… pic.twitter.com/Z8kMilWbBF
— ANI (@ANI) November 2, 2024
"सोशल मीडियावर हिंदू धर्म किंवा सनातन धर्माची खिल्ली उडवणारी कोणतीही पोस्ट यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्या दिशेने एक पाऊल म्हणून जनसेना पक्षाने सनातन धर्म संरक्षण ग्रुप किंवा नरसिंह वाराही विंगची स्थापना केली आहे. चर्च आणि मशिदीचा आदर केला पाहिजे. पण, सनातन धर्माविरुद्ध बोलून लोकांच्या भावना दुखावल्या तर त्याला शिक्षा होईल. मी एनडीए सरकारच्या वतीने नाही, तर जनसेनेच्या वतीने बोलत आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो, पण मला सनातन धर्माचे रक्षण करायचे आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे," अशी घोषणा पवन कल्याण यांनी केली.
पवन कल्याण यांना भाजपची साथ
पवन कल्याण यांच्या घोषणेवर भाजप नेते नलिन कोहली म्हणाले, "लोकांनी मर्यादा ओलांडल्या आहेत, सनातन धर्माविषयी वाटेल त्या गोष्टी बोलल्या जात आहेत. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री सनातनबद्दल काय म्हणाले, ते सर्वांनी ऐकले. त्यांनी सनातन धर्माची तुलना एका रोगाशी केली. फक्त सनातनलाच टार्गेट का? एखाद्याला सनातन धर्म बळकट करायचा असेल तर त्यात गैर काय?" असे म्हटले.