इन्फोसिसमधल्या कारभाराबाबत नारायण मूर्ती दुःखी
By admin | Published: February 10, 2017 10:07 AM2017-02-10T10:07:02+5:302017-02-10T11:30:57+5:30
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये प्रवर्तक तसेच संचालक मंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 10 - टाटा समूहातील वादानंतर आता देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये प्रवर्तक तसेच संचालक मंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. इन्फोसिस कंपनीमधील खालावलेल्या कारभारावर कंपनीचे सहसंस्थापक एन.आर.नारायण मूर्ती यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले की 'काही लोकांना कंपनी सोडताना मनमानी पद्धतीने जास्त पैसे (सेव्हरेंज पॅकेज) देण्यात येत आहे, यामुळे अन्य कर्मचा-यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत आहे'.
यावेळी, कंपनीतील माजी अधिकारी डेविड कॅनडी आणि राजीव बन्सल यांना देण्यात आलेल्या सेव्हरेंज पॅकेजवर त्यांनी प्रश्नदेखील उपस्थित केले. एखादी कंपनी कोणत्याही कर्मचा-याचे करारपत्र नियोजित कार्याकाळापूर्वीच संपवते, त्यावेळी संबंधित कर्मचा-याला सेव्हरेंज पॅकेज दिले जाते. इन्फोसिसच्या नियमानुसार कर्मचा-यांना 3 महिन्याचे सेव्हरेंज पॅकेज दिले जाते. मात्र कॅनडी यांना 12 महिने आणि राजीव बन्सल यांना 30 महिन्यांचे सेव्हरेंज पॅकेज दिले गेले. ही पद्धत अयोग्य असल्याचे सांगत नारायणमूर्ती यांनी यामुळे अन्य कर्मचा-यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांच्यापासून काहीही समस्या नाही, मात्र कंपनीचे संचालक मंडळ ज्यापद्धतीने काम करत,त्यावर दुःखी असल्याची प्रतिक्रिया नारायणमूर्ती दिली आहे. काही कर्मचा-यांना मोठ्या रक्कमेतील सेव्हरेंज पॅकेज मिळत असल्याने अन्य कर्मचा-यांनी यावर असंतोष व्यक्त केला आहे. कर्मचा-यांचे जवळपास 1,800 हून अधिक ई-मेल प्राप्त झाले असून यात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
ई-मेलद्वारे कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त करत,'आम्हाला केवळ 80 टक्के चल वेतन (Variable Pay) मिळते, मात्र कंपनी सोडणा-या अधिका-यांना दोन वर्षांपर्यंतचे 100 टक्के चल वेतन देण्यात आले, हे योग्य आहे का?, अस प्रश्न उपस्थित केला गेला आहे. नारायणमूर्ती यांनी सांगितले की, इन्फोसिसला या प्रकरणात अन्य कर्मचा-यांचे समाधान करणं गरजेचं आहे कारण यामुळे त्यांचे मनोधैर्य खचत आहे. 'आम्ही मूल्ये आणि संस्कृतीवर आधारित असलेल्या या संस्थेला बनवण्यासाठी आपले आयुष्य घालवले, त्यामुळे येथील आताची परिस्थिती पाहून दुःख होते', अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.