नारायण राणेंना 'राजधानी'चं तिकीट ?; महाराष्ट्राऐवजी दिल्लीत मंत्रिपद देण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 06:46 PM2018-02-28T18:46:57+5:302018-02-28T18:46:57+5:30
भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवी दिल्लीत उपस्थिती लावली आहे.
नवी दिल्ली- भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवी दिल्लीत उपस्थिती लावली आहे. विशेष म्हणजे या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेसुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत. या दिल्ली भेटीदरम्यान नारायण राणे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असून, चांगल्या खात्याचे मंत्री करावे, अशीही मोर्चेबांधणी करणार आहेत. नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, नारायण राणेंना महाराष्ट्रात नव्हे, तर केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु नारायण राणेंना महाराष्ट्रातच मंत्रिपद हवे आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 21 सप्टेंबर रोजी राणे यांनी राजीनामा दिला होता. 21 फेब्रुवारीला त्याला पाच महिने पूर्ण झाले. आता तरी त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का?, आता ते मंत्री होणार, या बातम्यांवरही कुणाचा विश्वास बसत नाहीये. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा निर्वाणीचा इशाराही राणेंनी भाजपा नेतृत्वाला दिला आहे.
राणेंसारखा मोठा नेता सत्ताधा-यांना हवाही वाटतो आणि नकोसाही होतोय असे का, याचे उत्तर मिळत नसल्याने त्यांचे समर्थकही अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राणे यांना शब्द देऊनही तो पाळणे त्यांच्यासाठीच अडचणीचे ठरतेय. राणेंना मंत्रिपद देण्यासाठी शिवसेनेचाही विरोध आहे. राणेंमुळे चंद्रकांत पाटलांना त्यांच्याकडचे महसूल किंवा बांधकाम खाते जाईल, अशी भीती सतावू लागली आहे. तर दानवेंना पक्षात दुसरा तुल्यबळ मराठा नेता नको आहे. दुसरे मराठा नेते विनोद तावडेंचीही राणेंमुळे अडचण होईल, असे वाटू लागले आहे. त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश रखडल्याचीही चर्चा आहे.