स्वबळाची भाषा करणारे 'स्वाभिमानी' नारायण राणे भाजपाच्या बैठकीला, अमित शहांनाही भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 06:52 PM2019-01-02T18:52:34+5:302019-01-02T18:58:29+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता ते भाजपा खासदारांच्या बैठकीत सामील होणार आहे. विशेष म्हणजे स्वबळाची भाषा करणारे राणे दिल्लीत भाजपा खासदारांच्या बैठकीत कसे काय पोहोचले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राणे भाजपावर टीका करत सुटले आहेत. राणेंना भाजपानं आपल्या कोट्यातूनच राज्यसभेवर पाठवलं आहे. म्हणजेच ते भाजपापुरस्कृत खासदार आहेत. तरीही संधी मिळेल तिथे ते भाजपावर टीका करतात. राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्ष काढला. हा पक्ष एनडीएत सामील झाल्यानंतर त्यांची भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर वर्णी लागली. राणेंना किंवा त्यांच्या पुत्राला पुन्हा सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असेल, तर आधी हा मतदारसंघ शिवसेनेकडून सोडवून घ्यावा लागेल. सेना आणि राणेंचे एकूण ‘मधूर’ संबंध बघता ती शक्यता कमीच दिसते.
तसेच भाजपाही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यास आग्रही आहे. त्या मतदारसंघातून सध्या सेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ आपसुकच शिवसेनेकडे जाणार आहे, याची राणेंना पूर्वकल्पना आहे. त्यामुळेच राणेंनी स्वबळाची भाषा केली होती. परंतु राणे आता भाजपा खासदारांच्या दिल्लीतील बैठकीला पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणेंची नेमकी भूमिका काय, हे अनेकांसाठी न उलगडणारं कोडंच आहे.
पवारांच्या भेटीतून राणेंनी वेगळा पर्याय शोधला असल्याचे मानले जात होते. परंतु ही वैयक्तिक भेट असल्याचंही राणेंनी सांगितलं होतं. त्यामुळे एनडीएत असलेला राणे यांचा स्वाभिमान पक्ष भविष्यात महाआघाडीत दाखल होण्याच्या दृष्टीने ही साखरपेरणी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण राणे दिल्लीत भाजपा खासदारांच्या बैठकीनंतर अमित शाहांची भेट घेणार आहेत. त्यामुळे अमित शाह आणि राणेंच्या बैठकीचा सर्वांच्या नजरा आहेत.