नारायण राणेंचा शिवसेनेवर निशाणा, शिंदेच करणार विमानतळाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:03 AM2021-09-08T08:03:35+5:302021-09-08T08:03:57+5:30
शिंदे करणार चिपी विमानतळाचे उद्घाटन
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले आणि सिंधुदूर्गला हवाईमार्गाने जोडणारे चिपी विमानतळ ९ ऑक्टोबरपासून सुरु होईल, अशी घोषणा करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत म्हणाले, वसुलीत शिवसेनेचे नेते मास्टर आहेत.
गेल्या सात वर्षापासून तयार असलेले चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी शिवसेनेने काहीही केले नाही. शिवसेना नेते फक्त वसुलीत मास्टर आहेत, ते कोणतेही काम करीत नाहीत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने ९ ऑक्टोबरपासून हे विमानतळ सुरु होत आहे.
२०१४ पर्यंत मी हे विमानतळ उभारण्याचे काम पूर्ण केले; परंतु, शिवसेनेने गेली सात वर्षे काहीही केले नाही. ७ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचा शिवसेनेच्या खासदाराचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. शिवसेनेचा कोणताही दावा निराधार असतो. केंद्रात मंत्रिपद दिल्यापासून नारायण राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या टीकेमुळे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्यात काढलेली जनआशीर्वाद यात्राही वादात सापडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबबात केलेल्या वादगस्त वक्तव्यामुळे राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.