Narendra Modi 3.0 : गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र...; भाजप आपल्याकडेच ठेवणार 'CCS' मधील ही महत्वाची मंत्रालयं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 11:56 AM2024-06-09T11:56:58+5:302024-06-09T12:00:51+5:30
Narendra Modi 3.0 : कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) मध्ये समाविष्ट असलेली गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र ही चारही महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते...
Narendra Modi-Oath-Ceremony : लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या सलग तिसऱ्या विजयानंतर, आज नरेंद्र मोदीही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. आज सायंकाळी 7.15 वाजता मोदी 3.0 च्या शपथविधीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक परदेशी पाहुन्यांचीही उपस्थिती असेल. दरम्यान, शपथ विधासाठी संभाव्य मंत्र्यांना फोनही येऊ लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) मध्ये समाविष्ट असलेली गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र ही चारही महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते.
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, भाजप गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षणसारखी मंत्रालये आपल्याकडेच ठेवणार आहे. ही मंत्रालये मोदी सरकारच्या गेल्या दोन्ही कार्यकाळात भाजपकडेच होती. यातच, ज्या माजी केंद्रीय मंत्र्यांना फोन गेला आहे, त्यांत राजनाथ सिंह, नितिन गडकरी, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, ज्योतिरादित्य शिंदे आणि जितेंद्र सिंह आदींचा समावेश आहे.
यातच, लोकसभा अध्यक्षपदासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. या पदावर मित्रपक्षांचेही लक्ष आहे. एनडीए सरकारच्या गेल्या दोन कार्यकाळांत भाजप नेत्या सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला हे लोकसभाध्यक्ष होते.
मोदी शपथविधीपूर्वी मंत्री परिषदेच्या सदस्यांची भेट घेणार -
मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली आणि राष्ट्रपती भवनाभोवती अभेद्य सुरक्षा व्यवस्था असणार आहे. दरम्यान, पाच वाजल्यापासूनच पाहुणे राष्ट्रपती भवनात पोहोचण्यास सुरुवात होईल आणि 7:15 वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल.