नरेद्र मोदींनी शपथविधीसाठी रविवारचा दिवसच का निवडला? प्रभू श्रीरामांसोबत आहे खास कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 09:34 AM2024-06-09T09:34:41+5:302024-06-09T09:42:06+5:30
Narendra Modi 3.0 : ...हा दिवस पंतप्रधान पदाची शपथ (Oath) घेण्यासाठी अत्यंत शूभ मानला जातो.
नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे की, या शपथविधी समारंभासाठी रविवार अर्थात ९ जूनचा दिवसच का निवडण्यात आला? तर, ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, तारीख बदलण्याचे कारण ९ जूनला निर्माण होणारा शुभ योगही असू शकते (यापूर्वी, सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ८ जूनला शपथविधी समारंभ होणार होता). ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्यानुसार, ९ जून, २०२४ ही ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी (विक्रम संवत् २०८१) आहे. हा दिवस पंतप्रधान पदाची शपथ (Oath) घेण्यासाठी अत्यंत शूभ मानला जातो.
शासन अथवा सत्तेचा कारक - सूर्य
ज्योतिषाचार्यांच्या मते, ९ जून अर्थात रविवार हा सूर्याचा दिवस आहे. आणि सूर्य देवच शासन अथवा सत्ता चालवतात. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. याशिवाय, अंक शास्त्रानुसार ९ हा अंक मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि मंगळ हा ऊर्जेचा कारक मानला जातो. यामुळे, जेव्हा सूर्य आणि मंगळ या दोन्हींना एकत्रित साधून सरकार स्थापन केले जाईल, तेव्हा ते निश्चितत देश आणि जगात यश मिळवेल.
प्रभू रामचंद्रांचा जन्मही या नक्षत्रावर झाला होता -
ज्योतिषाचार्य म्हणाले, रविवारी पुनर्वसू नक्षत्र आहे. प्रभु श्रीरामांचा जन्मही पुनर्वसू नक्षत्रावरच झाला होता. नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामांचे अनन्य भक्त आहेत. महत्वाचे म्हणजे, पुनर्वसू नक्षत्रावर ज्या लोकांचा जन्म होतो, ते लोक इतरांची सेवा करण्यासाठी अथवा काही चांगले करण्यासाठी नेहमीच तयार असतात. यामुळे, निश्चितच पुनर्वसू नक्षत्रावर शपथविधी होत असल्याने, हे सरकार देशातील जनतेच्या भल्यासाठी आणि सेवेसाठी तत्पर राहील.
आज ६ शुभ योग -
ज्योतिषाचार्य डॉ. तिवारी यांच्यानुसार, आज (रविवार ९ जून) ६ शुभ योगही तयार होत आहेत. यात पहिला म्हणजे, वृद्धि योग, दुसरा पुनर्वसू नक्षत्र, तिसरा रवि पुष्य योग, चौथा रवि योग, पाचवा सर्वार्थ सिद्धि योग आणि सहावा म्हणजे, तृतीया तिथी. पूर्वीच्या कार्यकाळाप्रमाणेच 'मोदी सरकार ३.०' साठीही मोदींनी शपथविधीसाठी वृश्चिक लग्नच निवडले आहे. ही एक स्थिर राशी बरोबरच त्यांच्या कुंडलीतील लग्न राशीही आहे. याच बरोबर या राशीला गुप्तपणे काम करणारी राशीही मानले जाते.