नरेंद्र मोदी, अमित शहा, अडवाणींना काँग्रेसचे चौधरी म्हणाले घुसखोर; भाजप सदस्यांची माफीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:03 AM2019-12-03T05:03:58+5:302019-12-03T05:05:05+5:30
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे ‘घुसखोर’ आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे ‘घुसखोर’ आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केल्यावर सोमवारी लोकसभेत शाब्दिक वादावादी झाली. भाजपच्या सदस्यांनी चौधरी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.
वादग्रस्त बनलेले राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) विषयावर रविवारी बोलताना चौधरी यांनी वरील वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘मोदी आणि शहा यांची घरे गुजरातेत आहेत; पण ते दिल्लीत राहत असल्यामुळे ते स्थलांतरित आहेत.’ संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा उल्लेख करून म्हणाले की, त्यांच्या (चौधरी) स्वत:च्या पक्षाचा नेताच ‘घुसखोर’ आहे आणि ते मात्र त्याच मुद्यावरून इतरांना लक्ष्य करीत आहेत.’
प्रश्नोत्तर तासात चौधरी हे पोलाद मंत्रालयाशी संबंधित पुरवणी प्रश्न विचारण्यास उभे ठाकले तेव्हा भाजपच्या सदस्यांनी ‘घुसखोर’ हा शब्द अनेक वेळा उच्चारून त्यांचा उपहास करण्याचा प्रयत्न केला. त्यावर चौधरी यांनी तात्काळ त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, ‘होय, मी घुसखोर आहे. मी वाळवी (टर्माईट) आहे. ‘मोदी हे घुसखोर आहेत. अमित शहा घुसखोर आहेत. लाल कृष्ण अडवाणी घुसखोर आहेत.’ त्यावर पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर देताना ‘चौधरी यांचे कारस्थान लवकरच उघडे पाडले जाईल’, असे म्हटले. ‘सब खुलेंगी, आप की परिभाषा से देश नही चलेगा’, असे प्रधान म्हणाले.