'या' कारणामुळे भाजपाच्या ५० टक्के खासदारांचा पत्ता कट करणार मोदी-शहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 11:12 AM2018-03-28T11:12:54+5:302018-03-28T11:12:54+5:30
अनेकांनी सोशल मीडियावर आपली अकाऊंटसच उघडली नव्हती. अनेकजणांनी केवळ औपचारिकता म्हणून अकाऊंट उघडली पण नंतर त्याकडे ढुंकून बघितले नाही.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांना वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिल्याने आता सर्वच पक्षाच्या खासदारांकडून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपाचे खासदारही याला अपवाद नाहीत. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाच्या 50 टक्के खासदारांना पुढची टर्म मिळण्याची शक्यता धुसर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या खासदारांच्या कामगिरीवर प्रचंड नाराज असल्याचे समजते.
त्यामुळे लोकसभेसाठी विद्यमान खासदारांना उमेदवारी देताना पक्षाकडून त्यांची संसदेतील हजेरी आणि मतदारसंघातील काम या घटकांचा विचार केला जाणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या संपूर्ण प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. यापैकी अनेक खासदारांच्या कामगिरीवर मोदी व शहा प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे 2019 मध्ये या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
मध्यंतरी मोदी व शहा यांनी खासदारांच्या बैठकीत ज्याची कामगिरी खराब असेल त्याला तिकीट देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. तेव्हाच आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे निकष ठरवण्यात आले होते. यामध्ये खासदारांची मतदारसंघातील कामगिरी, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी आणि सोशल मीडियावरील सक्रियता या गोष्टींचा समावेश आहे. जे नेते सोशल मीडियावर लोकप्रिय असतील त्यांची मतदारसंघातील लोकप्रियताही जास्त असेल, असा मोदी-शहा जोडगोळीचा अंदाज आहे.
मात्र, अनेक खासदारांनी नेतृत्त्वाचे हे बोलणे फार गंभीरपणे घेतले नव्हते. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपली अकाऊंटसच उघडली नव्हती. अनेकजणांनी केवळ औपचारिकता म्हणून अकाऊंट उघडली पण नंतर त्याकडे ढुंकून बघितले नाही. त्याचा फटका आता या खासदारांना बसणार आहे. भाजपा या निष्क्रीय खासदारांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार करत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांनंतर तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. 2014 नंतर भाजपाने पंजाब व बिहारचा अपवाद वगळता अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, पोटनिवडणुकांमध्ये भाजपाने सपाटून मार खाल्ला आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जिथे-जिथे प्रचार केला नाही, तिथे पक्षाला अपयश आल्याचे यावरून अधोरेखित झाले आहे.