लोकसभेच्या 'या' ४२९ जागा जिंकायच्या कशा?; मोदी-शहांना चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 03:46 PM2018-05-23T15:46:11+5:302018-05-23T15:49:18+5:30
'मिशन २०१९'साठी कंबर कसलेल्या मोदी-शहांना, १३ राज्यांमधील ४२९ लोकसभा मतदारसंघांमध्ये 'कमळ' कसं फुलवायचं याची चिंता सतावू लागलीय.
नवी दिल्लीः देशातील २० राज्यांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्याचा पराक्रम करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्षअमित शहा ही जोडी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर चक्रव्यूहात अडकल्याचं चित्र आहे. 'मिशन २०१९'साठी कंबर कसलेल्या मोदी-शहांना, १३ राज्यांमधील ४२९ लोकसभा मतदारसंघांमध्ये 'कमळ' कसं फुलवायचं याची चिंता सतावू लागलीय. त्याचं कारण आहे, विरोधी पक्षांनी केलेली हातमिळवणी आणि त्यांच्यात वाढू लागलेली एकी.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, पण सत्तासुंदरीनं त्यांना हूल दिली. अक्षरशः त्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावला गेला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणाऱ्या काँग्रेस-जेडीएसनं गट्टी केली. त्यांना मायावतींनीही 'टाळी' दिली आणि बीएस येडियुरप्पांना अडीच दिवसांत मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. बहुमत चाचणीआधीच त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपा पार नाकावर आपटली. त्यानंतर, 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या न्यायाने देशभरातील विरोधक एकत्र आलेत. कुमारस्वामींच्या शपथविधीला देशभरातील भाजपाविरोधी पक्षांचे नेते हजर राहणार आहेत. २०१९च्या लोकसभा महासंग्रामात मोदी-शहांचा विजयरथ रोखण्याचा विडाच त्यांनी उचललाय.
उत्तर प्रदेशः (एकूण जागा - ८०)
२०१४ मध्ये उत्तर प्रदेशनं मोदी-शहांना भक्कम साथ दिली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही जनतेनं भाजपाला कौल दिला होता. परंतु, अलीकडेच झालेल्या फुलपूर आणि गोरखपूर पोटनिवडणुकीत अखिलेश-माया एकत्र आले आणि 'कमळ' कोमेजलं. त्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेस-सपा-बसपाची आघाडी झाल्यास, गेल्या निवडणुकीत ८० पैकी ७३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला मोठा फटका बसू शकतो.
बिहारः (एकूण जागा - ४०)
नितीश कुमार रालोआत आल्यानं, २०१९ मध्ये बिहारमधील आकडा आणखी वाढवण्यासाठी मोदी-शहा मोर्चेबांधणी करत होते. परंतु, आता काँग्रेस-राजदची एकी त्यांना टक्कर देऊ शकते. मोदींच्या पराभवासाठी काँग्रेस नेते लालूंना टाळी द्यायला मागे-पुढे पाहतील असं वाटत नाही.
पश्चिम बंगालः (एकूण जागा - ४२)
तृणमूल काँग्रेसचा, ममता बॅनर्जी यांचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारण्याचा भाजपाची रणनीतीही फ्लॉप ठरू शकते. काँग्रेस-तृणमूल एकत्र येतीलच, पण डावेही त्यांना साथ देऊ शकतात. तसं झाल्यास मोदी-शहांच्या अडचणी फारच वाढतील.
कर्नाटकः (एकूण जागा - २८)
कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा या हेतूने येडियुरप्पांनी राजीनामा देताना भावनिक साद घातली आहे. परंतु, काँग्रेस-जेडीएस २०१९ मध्येही एकत्र मैदानात उतरले तर सगळीच समीकरणं बदलतील आणि भाजपाची कोंडी होईल.
महाराष्ट्रः (एकूण जागा - ४८)
लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचे संकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने दिले आहेत. त्यासोबतच, भाजपावर कुरघोडी करण्यासाठी झटणारी शिवसेनाही स्वबळावर लढली, तर भाजपाला 'जोर का झटका' लागू शकतो.
त्याशिवाय, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या साथीने पाय रोवण्याचे भाजपाचे मनसुबे उधळण्यासाठी काँग्रेस-द्रमुक युती करू शकतात. ओडिशामध्येही बीजू जनता दल आणि काँग्रेस यांच्यात तह होऊ शकतो. दुसरीकडे, रालोआची साथ सोडणारा तेलुगू देसम पक्षही काँग्रेसच्या मदतीला जाऊ शकतो. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने आधीच हातमिळवणी केली आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हं आहेत.
हे सगळं गणित बघता, लोकसभेच्या ४२९ जागांसाठी रणनीती आखताना मोदी-शहा आणि त्यांच्या टीमची चांगलीच दमछाक होणार आहे. अर्थात, विरोधकांची आत्ता झालेली एकी किती टिकते, यावरच पुढचं सगळं राजकारण अवलंबून आहे.