नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची महाबलीपुरम येथे होणार भेट, काश्मीरवर चर्चा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 09:03 AM2019-10-11T09:03:40+5:302019-10-11T09:05:16+5:30
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथे भेट होणार आहे.
नवी दिल्ली/महाबलीपुरम - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथे भेट होणार आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र मोदी आणि जिनपिंग यांच्या काश्मीरप्रश्नावर चर्चा होणार का हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची घोषणा भारत सरकारने केल्यानंतर चीनने त्याचा विरोध केला होता. तसेच काश्मीरच्या मुद्द्यावर आपण भारतासोबत सहमत नसल्याचे चीनने वारंवार सांगितले होते. मात्र काश्मीरबाबतचे चीनचे मत भारताने नेहमीच फेटाळून लाववेले आहे. त्यामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यात होणाऱ्या बैठकीत काश्मीर प्रश्न उपस्थित झाल्यास त्यामुळे चर्चेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मोदी आणि जिनपिंग यांच्यात व्यापार, गुंतवणूक अशा प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे चीनची आर्थिक कोंडी झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी मालाच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताला आपल्या बाजूने वळवणयाचा चीनचा प्रसत्न आहे.
दरम्यान, गुरुवारी चिनी परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीर प्रश्नावरून चर्चा करण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली. काश्मीरबाबत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, काश्मीरबाबत चीनची भूमिका स्पष्ट आणि स्थायी आहे.' त्यामुळे काश्मीरबाबत चीनच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता कमीच आहे.