आता 6000 नाही तर 12 हजार मिळणार; मोदींची राजस्थानमध्ये घोषणा, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:08 AM2023-11-22T11:08:52+5:302023-11-22T11:12:17+5:30
Narendra Modi : एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी सर्वात प्रमुख योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड दौऱ्यात या योजनेचा तिसरा हप्ता जारी केला होता.
राजस्थानमध्ये याच दरम्यान, एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये दिले जातील. याशिवाय एमपीसीवर शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करून बोनस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. म्हणजेच राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आल्यास राजस्थानच्या शेतकरी लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशातही भाजपाने आश्वासन दिलं आहे की, जर मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन झाले तर पीएम किसान अंतर्गत 12,000 रुपये दिले जातील. यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार आणि सहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये योजनेचा 15 वा हप्ता जारी केला होता. याआधी, सरकारने 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पाठवली होती.