व्वा इंदूर! मोदींचं आवाहन अन् भाजपा कार्यकर्त्यांनी लगेचच स्वच्छ केला संपूर्ण रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 01:30 PM2023-11-15T13:30:37+5:302023-11-15T13:32:08+5:30
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंदूरमध्ये रोड शो केला. यावेळी मोठा गणपती ते राजवाडा या रोड शोमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रोड शोनंतर, पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना संपूर्ण परिसर लवकरात लवकर स्वच्छ करण्यास सांगितलं होतं.
रिपोर्टनुसार, पीएम मोदींच्या या आदेशानंतर काही तासांतच रोड शोचा संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आला. भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची ख्याती लक्षात घेऊन, काही तासांतच संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. सकाळी रस्त्यावर एकही फुल पडलेलं दिसलं नाही. हा सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आणि इंदूरच्या लोकांचा स्वच्छतेकडे असलेला कल यांचा परिणाम होता.
मोदी संध्याकाळी 6.15 वाजता मोठ्या गणपतीपासून खुल्या जीपमध्ये चढताच लोकांनी जय श्री रामच्या घोषणा देत त्यांचं स्वागत केले. साहजिकच लोकांची गर्दी होती. हा रोड शो सुमारे 1.4 किलोमीटरचा होता. यावेळी नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक मोठ्या संख्येने जमले होते.
विशेष म्हणजे मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. 230 जागांसाठी 17 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी इंदूरला पोहोचले होते.