तोटी, टाईल्स आणि पुतळ्यांवरून मोदींनी केला अखिलेश,मायावतींवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 10:47 PM2019-04-14T22:47:35+5:302019-04-14T22:48:23+5:30
आज मुरादाबाद येथे झालेल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्षा मायावतींवर जोरदार हल्ला केला.
मुरादाबाद - लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या महाआघाडीमुळे भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, आज मुरादाबाद येथे झालेल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्षा मायावतींवर जोरदार हल्ला केला. यावेळी अखिलेश यादव यांचे वास्तव्य असलेल्या सरकारी निवासस्थानात झालेली तोट्या आणि टाईल्सची मोडतोड तसेच मायावतींनी उभारलेले पुतळे यावरून मोदींनी या दोघांवरही निशाणा साधला. तसेच विरोधकांकडून देण्यात येणारे शिव्याशाप ऐकून मी शिव्याप्रुफ झालो आहे, असेही मोदींनी सांगितले.
''सकाळ-संध्याकाळ मला शिव्या देणे हाच सपा-बसपाता अजेंडा आहे. काही काँग्रेसवाले मला शौचालयांचा सौदागर म्हणतात. तर सपाचे एक नेते म्हणाले की माझे बोलणे शौचालयापासून सुरू होते आणि शौचालयावर जाऊन संपते. पण बबुआजी शौचालयाच्या चौकिदारीचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला समजू शकणार नाही. तुमच्याकडे परदेशी टाईल्स लावलेल्या विदेशी तोट्या असलेले टॉयलेट आहेत. पण त्या कोट्यवधी माता-भगिनींना शौचालयाचे महत्त्व विचारा ज्यांना तुम्ही अंधाराची वाट पाहण्यासाठी भाग पाडले होते.'' असा टोला मोदींनी लगावला.
यावेळी मोदींनी मायावतींवरही टीका केली.''आज मायावतींचा मोठेपणा पाहा. त्या अखिलेश यांचा इतका सन्मान करत आहेत की महाआघाडीती एक उमेदवार ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांना हार घालणेही मान्य नाही, अशा उमेदवाराठी मायावती मत मागत आहेत. याच मायावती एकेकाळी नेताजींना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देत असत, मात्र अखिलेश यांना आज त्याचा विसर पडला आहे. राजकारण काय काय करवून घेईल याचा नेम नाही. आज हत्ती सायकलवर स्वार झाला आहे आणि निशाण्यावर चौकीदार आहे.,'' असा टोलाही मोदींनी लगावला.