70 वर्षांत गरिबांची बँक खाती उघडू न शकणारे खात्यात पैसे काय जमा करणार? मोदींचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:37 PM2019-03-28T12:37:55+5:302019-03-28T13:11:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरुवात आज मीरत येथील जनसभेपासून केली. त्यावेळी मोदींनी विविध प्रश्नांवरून विरोधकांना लक्ष्य केले.
मीरत (उत्तर प्रदेश) - जे लोक गेल्या 70 वर्षांत सर्वसामान्य गरिबांचे साधे बँक खाते उघडू शकले नाहीत ते गरीबांच्या बँका खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आज उत्तर प्रदेशमधील मीरत येथे आयोजित केलेल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात केली. यावेळी मोदींनी विविध प्रश्नांवरून विरोधी पक्षांना लक्ष्य केले.
यावेळी सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळच्या निवडणुकीत एकीकडे चौकीदार आहे आणि दुसरीकडे डागदार नेत्यांची जमवाजमव आहे. पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागितला होता. तुम्हीही मला भरभरून प्रेम दिले. आता गेल्या पाच वर्षांत मी जे काम केले त्याचा सर्व हिशेब तुम्हाला देईन, तसेच इतरांचा हिशेबही घेईन. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू राहतील तेव्हाच योग्य हिशोब होईल. शेवटी मी चौकीदार आहे आणि चौकीदार अन्याय करणार नाही.''
काँग्रेसने गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याचा केलेल्या घोषणेचाही मोदींनी समाचार घेतला. ''ज्यांना गेल्या 70 वर्षांत सर्वसामान्य गरिबांचे साधे बँक खाते उघडता आले नाही. ते आता गरीबांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.
''गेल्या चार दशकांपासून आमचे जवान वन रँक वन पेन्शनची मागणी करत होते. त्यांचा मागणी पूर्ण करण्याचे काम या चौकीदाराने केले आहे. देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना 75 हजार कोटी रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य देण्याचे कामही आमच्या सरकारने केले आहे.''असे मोदींनी सांगितले.
#WATCH: PM Narendra Modi says in Meerut, "Sapa (SP) ka 'sha', RLD ka 'Raa' aur Baspa (BSP) ka 'ba', matlab 'sharab'...Sapa, RLD, Baspa, ye 'sharab' aapko barbaad kar degi." pic.twitter.com/Sc7owbEO8p
— ANI UP (@ANINewsUP) March 28, 2019
जमीन, आकाश आणि अंतराळ अशा तिन्ही ठिकाणी सर्जिकल स्ट्राइक करण्याचे काम याच चौकीदाराच्या सरकारने केले आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील गरिबांना आरक्षण देण्याचा निर्णयही याच सरकारने घेतला आहे, असे मोदीं म्हणाले. काही वर्षांपूर्वी दिल्लीत भेसळ सरकार होते. तेव्हा देशाच्या विविध भागात बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळी दहशतवाद्यांची जात, धर्म पाहिला जायचा, असाही टोला मोदींनी लगावला.