नरेंद्र मोदी बनलेत'NRI, त्यांना बनवा 'जगाचे पंतप्रधान' - लालूप्रसाद यादव
By admin | Published: June 13, 2016 08:58 AM2016-06-13T08:58:01+5:302016-06-13T09:00:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे NRI(अनिवासी भारतीय) बनले असून त्यांच्यासाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, अशी टीका लालू यादवांनी केली
Next
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौ-यावरून विरोधकांनी नेहमीच त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात मोदींनी अनेक देशांचे दौरे केले आहेत, त्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरले. आता यामध्ये राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भर पडली आहे. लालू यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौ-यांच्या पार्श्वभूमीवर 'मोदी हे NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत' अशी टीका केली असून पंतप्रदान मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' असे पद तयार करावे असे अपीलही जगभरातील नेत्यांसमोर केले आहे.
चारा घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी लालू यादव रांची येथे आले असून तेथेच त्यांनी पंतप्रधान मोदींवर आपल्या खास शैलीत टीका केली. ' मोदी या देशाचे (भारत) पंतप्रधान आहेत, मात्र सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच (विदेश दौ-यांमुळे) असतात. मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, असे अपील मी जगभरातील नेत्यांना करू इच्छितो' असे ते म्हणाले.
यापूर्वीही लालू यादव यांनी मोदींवर अनेक वेळा टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतला असून आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू अशा तिखट शब्दांत त्यांनी मोदींवर हल्ला चढवला होता.
चारा घोटाळा अर्थात चाईबासा कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांवा शिक्षा सुनावण्यात आली होती. कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच्या चारा घोटाळ्याच्या एका प्रकरणात सीबीआयच्या दुसऱ्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद व अन्य आरोपींना चाईबासाप्रकरणी २०१४मध्ये शिक्षा ठोठावली होती़, तूर्तास ते जामिनावर आहेत़.