मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 07:12 AM2024-06-11T07:12:25+5:302024-06-11T07:13:04+5:30

Narendra Modi called Manmohan Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी सोमवारी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवगौडा यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Narendra Modi called Manmohan Singh and sought his blessings | मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद

मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद

 नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी सोमवारी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवगौडा यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ३० कॅबिनेट दर्जाचे मंत्री आणि इतर ७१ मंत्र्यांसह शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला. पाटील आणि सिंग हे दोघेही यूपीए सरकारच्या काळात अनुक्रमे राष्ट्रपती आणि पंतप्रधान होते, तर देवेगौडा काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या संयुक्त आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान होते. देवेगौडा यांचा पक्ष जनता दल (धर्मनिरपेक्ष) सध्याच्या एनडीएचा एक भाग आहे आणि त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत.

मोदींवर देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव
नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनीही मोदींचे अभिनंदन केले आहे. रामाफोसा यांनी देश, जनतेप्रतिच्या वचनबद्धतेबद्दल मोदींचे कौतुक केले. मोदींचे अभिनंदन करताना सिंगापूरचे पंतप्रधान वोंग म्हणाले की, ‘मला खात्री आहे, की तुमच्या (मोदी) नेतृत्त्वाखाली भारताची भरभराट होत राहील.
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी अभिनंदन केले आहे. ‘विकसित भारत’ संकल्पनेला समर्पित असलेल्या मोदींना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा. भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल आंध्र प्रदेशच्या जनतेच्या वतीने मी मोदींचे अभिनंदन करतो, असे नायडू यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ’तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे ओडिशाचे मावळते मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष नवीन पटनायक यांनी सोमवारी अभिनंदन केले.

शरीफ काय म्हणाले?
- नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सोमवारी अभिनंदन केले.
- मोदींचे यश हे त्यांच्या नेतृत्त्वावरील लोकांचा विश्वास दर्शवते, असे शरीफ यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. मोदींनी या संधीचा फायदा घेऊन दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांचे भवितव्य घडवावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Narendra Modi called Manmohan Singh and sought his blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.