चिनी ‘वेईबो’ माध्यमावरील खाते नरेंद्र मोदींनी बंद केले; अॅपबंदीनंतर लगेच उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:08 AM2020-07-02T01:08:34+5:302020-07-02T01:08:55+5:30
माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले
नवी दिल्ली : चीनमधील ‘वेईबो’ या टिष्ट्वटरप्रमाणे लोकप्रिय असलेल्या समाजमाध्यमावरील गेले पाच वर्षे सुरू असलेले अकाऊंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे बंद केले आहे. प्रोफाईल फोटोसह सर्व पोस्टस व कमेंटस् काढून टाकल्याने मोदींचे हे वेईबो अकाऊंट बुधवारी पूर्णपणे कोरे झाले होते.
माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले. ‘वेईबो’वरील ‘व्हीआयपी’ अकाऊंट बंद करण्याची प्रकिया अन्य अकाऊंटस्च्या तुलनेत अधिक किचकट आहे. त्यामुळे चीन सरकारकडून अधिकृत परवानगी घेऊन खाते बंद करावे लागल्याने थोडा वेळ गेला, असे सूत्रांनी सांगितले. लडाख सीमेवरील चीनच्या दुस्साहसामुळे २० भारतीय जवानांना पत्कराव्या लागलेल्या हौतात्म्याची पार्श्वभूमीही या अकाऊंट बंदीच्या निर्णयामागे आहे.
मोदींच्या या ‘वेईबो’ अकाऊंटवर आतापर्यंत एकूण ११५ पोस्ट टाकलेल्या होत्या. अधिकृत परवानगीने अकाऊंट बंद केले जाईपर्यंत यापैकी ११३ पोस्ट परिश्रमपूर्वक ‘मॅन्युअली’ काढून टाकल्या गेल्या.
‘वीचॅट’वरील तीन पोस्ट गायब
- भारताच्या बीजिंगमधील वकिलातीचे ‘वीचॅट’ या चीनच्या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यावर अधिकृत अकाऊंट आहे.
- सीमेवरील तणाव वाढू लागल्यावर या अकाऊंटवर वकिलातीने टाकलेल्या तीन पोस्टस् १० दिवसांपूर्वी अचानक ‘गायब’ झाल्या होत्या. त्यात सीमातंट्यावर मोदींनी केलेल्या भाष्याचीही एक पोस्ट होती.
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याची पहिली शिखर बैठक झाली, तेव्हा २०१५ मध्ये मोठा गाजावाजा करीत मोदींचे हे ‘वेईबो’ अकाऊंट सुरू केले गेले होते.
- तेव्हापासून यंदाचा अपवाद वगळता, मोदी याच अकाऊंटवर पोस्ट टाकून १५ जून रोजी शी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. मोदींच्या सर्व पोस्ट चिनी भाषेत टाकल्या जायच्या. आतापर्यंत मोदींच्या या खात्याचे २.४४ लाख ‘फॉलोअर्स’ होते. त्यात बहुतांश चिनी नागरिक होते.