Narendra Modi: पंजाबच्या विजयाबद्दल 'आप'लं अभिनंदन, PM मोदींनी दिलं महत्त्वाचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:59 PM2022-03-10T22:59:39+5:302022-03-10T23:26:21+5:30
मोदींनी पंजाबच्या विजयाबद्दल आम आदमी पक्षाचेही अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी ट्विट करुन आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली - देशाच्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये कमळ फुलविण्यात यश मिळवलं असून भाजपच्या विजयाचा देशभरात जल्लोष होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यालयापासून लखनौपर्यंत भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. युपीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयी सभेला संबोधित करताना जनतेचे आभार मानले. तसेच, विरोधकांवर जोरदार प्रहारही केला.
मोदींनी पंजाबच्या विजयाबद्दल आम आदमी पक्षाचेही अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी ट्विट करुन आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. तसेच, केंद्र सरकार म्हणून पंजाब राज्यासाठी शक्य ते पाठबळ देण्याचं काम मी करेन, असे आश्वासनही मोदींनी आम आदमी पक्षाला दिले आहे.
I would like to congratulate AAP for their victory in the Punjab elections. I assure all possible support from the Centre for Punjab’s welfare. @AamAadmiParty
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2022
मी पंजाबमधील भाजप कार्यकर्त्याचं विशेष रुपाने कौतुक करतो. कारण, कठिण परिस्थितीतही त्यांनी ज्याप्रकारे पक्षाचा झेंडा बुलंद केला. त्यानुसार, पुढील काळात पंजाबमध्ये भाजप ताकदीनिशी विकसीत करण्यात येईल. पंजाब एक शक्तीच्या रुपाने पुढे येत असल्याचं मी आपल्या डोळ्यांनी पाहतोय. सीमावर्ती राज्य असल्याने पंजाबला, फुटीरतावादी राजकारणापासून सतर्क ठेवण्यसाठी भाजप कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता हे काम करत राहिल, असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाव न घेता टिका केली. तर, सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयावर होणाऱ्या टीकेवरुनही विरोधकांना, टिकाकारांना सुनावले. सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादावरही मोदी बोलले. तसेच, युक्रेनमधून भारतात परतलेल्या नागरिकांसाठी चालवलेल्या मोहिमेवरुन होत असलेल्या प्रांतवादाच्या टिकेवरुनही त्यांनी आपलं मत मांडलं.
लोकशाही भारतीयांच्या नसानसात
सध्या सुरू असलेल्या युद्धाचा प्रभाव जगावर होत आहे. मात्र, जे देश युद्ध लढत आहेत, त्यांच्याशी आर्थिक, सुरक्षा, शिक्षण, राजकीयदृष्टीतून भारताचं नातं आहे. सध्या तेल, गॅस, फर्टीलायजर, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. जगभरातील देशांमध्ये महागाई वाढत आहे. या कठिण परिस्थितीतही यंदाच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास भारत आत्मनिर्भर होत असल्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. जगभरातील या अनिश्चितेच्या वातावरणात भारताच्या जनतेनं, विशेषत: उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे. या निवडणुकीत लोकांना स्थीर सरकारसाठी मतदान केले, म्हणजे लोकशाही भारतीयांच्या नसानसात आहे.
ऑपरेशन गंगा मोहिमेला प्रांतवादाशी जोडलं
युक्रेनमध्ये भारताचे हजारो नागरिक अडकले होते, तेव्हाही देशातील काहीजणांनी भारताचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे 'ऑपरेशन गंगा' या मोहिमेलाही प्रांतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीला जातीवाद, प्रदेशवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे, असे मोदींनी म्हटले. मी निवडणुकांमध्येही विकासाच्याच गोष्टी केल्या. गरिबांना घर, गरिबांची प्रगती, विकास याच मुद्द्यावर मी भाष्य केलं.