'नरेंद्र मोदींना सातत्याने खलनायक ठरविणे चुकीचे'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 05:08 AM2019-08-24T05:08:59+5:302019-08-24T05:10:04+5:30
' मोदींना एकतर्फी विरोध करून काहीही फायदा होणार नाही. कोणतीही कृती ही चांगली, वाईट किंवा निराळी असते. '
नवी दिल्ली : मोदी सरकारला नेहमीच खलनायक ठरविणे, त्यांच्या सर्वच कारभाराबद्दल सतत नकारात्मक बोलणे योग्य नाही, या माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, शशी थरूर यांनी व्यक्त केलेल्या मतांना काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची उचित दखल न घेणे तसेच त्यांच्यावर सतत टीका करणे ही भूमिका विरोधी पक्षांना नेहमीच फायदेशीर ठरणार नाही, असे मत जयराम रमेश यांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभात गुरुवारी व्यक्त केले होते. त्यांच्या मताला पाठिंबा देत अभिषेक मनू सिंघवी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मोदींना एकतर्फी विरोध करून काहीही फायदा होणार नाही. कोणतीही कृती ही चांगली, वाईट किंवा निराळी असते. कोणत्या हेतूने एखादी कृती करण्यात आली याचे बारकाईने निरीक्षण करून मगच त्याविषयी मत व्यक्त करायला हवे. केवळ व्यक्ती पाहून विरोध व्हायला लागला तर ते निरर्थक ठरेल.
मोदींची भाषा मनाला भिडणारी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या यशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत कसा फायदा झाला याचे विश्लेषण जयराम रमेश यांनी केले होते. २०१४ पासून पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांनी अशी कोणती कामे केली की, ज्यामुळे ते पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आले याचा धांडोळा त्यांच्या टीकाकारांनी घ्यायला हवा. मोदी लोकांच्या मनाला भिडेल अशी भाषा वापरतात, असेही ते म्हणाले होते. जयराम रमेश यांच्या या मताशीही अभिषेक मनू सिंघवी यांनी सहमती दर्शविली आहे.