"पाकिस्तान, चीनविरुद्ध कधी युद्ध पुकारायचं ते पंतप्रधान मोदींनी निश्चित केलंय"
By कुणाल गवाणकर | Published: October 26, 2020 09:12 AM2020-10-26T09:12:44+5:302020-10-26T09:15:19+5:30
पूर्व लडाखमधील तणाव वाढला असताना भाजप प्रदेशाध्यक्षांचं विधान
बलिया: पाकिस्तान आणि चीनविरुद्ध कधी युद्ध पुकारायचं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं आहे, असं विधान भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केलं आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी शुक्रवारी हे विधान केलं. भारत आणि चीनमधील तणाव सध्या वाढला आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढवला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
स्वतंत्र देव सिंह यांनी युद्धाबद्दलचं विधान करताना राम मंदिर आणि जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या घटनांचा संदर्भ दिला. 'राम मंदिर आणि कलम ३७० च्या निर्णयाप्रमाणेच पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध कधी करायचं हे मोदींनी ठरवलं आहे,' असं स्वतंत्र देव सिंह म्हणाले. त्यांच्या या विधानाची ऑडियो क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
सिंह यांनी २३ ऑक्टोबरला बलियामधील सिकंदरपूरचे भाजप आमदार संजय यादव यांच्या निवासस्थानी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं. संजय यादव यांनी रविवारी सिंह यांच्या विधानाची ऑडियो क्लिप जारी केली. स्वतंत्रदेव सिंह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली. याबद्दल भाजपचे स्थानिक खासदार रविंद्र कुशवाहा यांना विचारणा केली असता, कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी प्रदेश अध्यक्षांनी ते विधान केल्याचं उत्तर त्यांनी दिलं.