पडद्यावर महाभारत पाहण्यासाठी नरेंद्र मोदी उत्सुक
By Admin | Published: June 5, 2017 05:05 PM2017-06-05T17:05:45+5:302017-06-05T17:10:20+5:30
जेव्हापासून सिनेमाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून सर्वत्र महाभारताची जोरदार चर्चा सुरू आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - "बाहुबली" या सुपरहिट सिनेमाचे सुपरहिट दिग्दर्शक एस.एस. राजामौली लवकरच आपला दुसरा बिग बजेट प्रोजेक्ट "महाभारत" प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. जेव्हापासून सिनेमाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून सर्वत्र महाभारताची जोरदार चर्चा सुरू आहे. महाभारत या चित्रपटाची कथा ही एम टी वसुदेवन यांच्या Randamoozham या कांदबरीवर आधारीत आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध मल्ल्याळम अभिनेता मोहनलाल एका महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार मोहनलाल भीमाची भूमिका साकारणार आहेत.
महाभारत या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. या चित्रपटाचं बजेट पाहता कुतूहलचाच मुद्दा ठरतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त करत चित्रपट निर्माते बीआर शेट्टी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी या भव्य चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेविषयी आपणही उत्सुक असल्याचं मोदींनी या पत्रात म्हटलं आहे. इतकच नव्हे तर त्यांनी हा चित्रपट देशासाठी गर्वाची गोष्ट असल्याचंही म्हटलं आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मोदींच्या या पत्राने भारावून गेलेले चित्रपटाचे कलाकार आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेणार आहेत. सात जुलै रोजी महाभारत चित्रपटाची टीम पंतप्रधानांची भेट घेणार आहे. आणखी वाचा : राजामौलीच्या महाभारतात आमिर "कृष्ण" व रजनीकांत "भीष्म पितामह"?
एक हजार कोटी बजेट असलेला हा चित्रपट दोन भागात बनवला जाणार आहे. यामध्ये मोहनलाल भीमाची भूमिका साकारणार आहेत. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि थलायवा रजनीकांत या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात रजनीकांत भीष्म पितामह आणि आमिर कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबतची माहिती समोर आलेली नाही. NDTV च्या वृत्तानुसार, नागार्जुन कृष्णाच्या भूमिकेत असणार आहे. तर कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत.
सप्टेंबर 2018मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, 2020 च्या सुरुवातीला चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात येईल. त्यानंतर 90 दिवसांनी दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येईल. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये बनवला जाणार आहे.