नरेंद्र मोदी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
By admin | Published: January 15, 2017 12:10 AM2017-01-15T00:10:58+5:302017-01-15T00:10:58+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असून, गेल्या आठवड्यात अशा प्रकारामुळे ते एका बैठकीतून निघूनच गेले, तर एका बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना
नवी दिल्ली : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असून, गेल्या आठवड्यात अशा प्रकारामुळे ते एका बैठकीतून निघूनच गेले, तर एका बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना नीट तयारी करून येत जा, असे सुनावले असे वृत्त आहे.
अधिकाऱ्यांनी केलेल्या एका प्रेझेंटेशनबाबत पंतप्रधानांनी एका बैठकीत असमाधान व्यक्त केले आणि त्यांना नीट काम करा, पुन्हा प्रेझेंटेशन तयार करा, अशा स्पष्ट सूचनाच केल्या. गेल्या आठवड्यातही अधिकाऱ्यांनी केलेले प्रेझेंटेशन नीट नसल्याने मोदी यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे, तर ते बैठकीतून मध्येच निघून गेले होते. वास्तविक बैठकांमध्ये ते सर्व अधिकाऱ्यांचे म्हणणे बारकाईने ऐकून घेतात, त्यांनी तयार केलेली प्रेझेंटेशन नीट पाहतात आणि त्यावर बारीकसारीक प्रश्नही विचारतात. असे असताना, त्यांनी बैठकीतून निघून जाणे, ही असामान्य बाब मानली जात आहे. प्रेझेंटेशन मध्यावर सोडून निघताना, अशा पद्धतीचा निष्काळजीपणा यापुढे सहन केला जाणार नाही, असे संकेतच पंतप्रधान मोदींनी दिले. आपल्या कार्यालयातील कामावर आणि एकूणच गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे प्रेझेंटेशन हे कृषी आणि संबंधित क्षेत्रातील अधिकारी सादर करत होते. ते पाहत असतानाच, त्यात काहीच नवे नाही, कोणतीही नवी कल्पना त्यात मांडण्यात आलेली नाही, असे त्यांच्या ध्यानात आले आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच अधिकाऱ्यांना ऐकवले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तयारी करून येत जा
तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेले नाहीत, असे हे प्रेझेंटेशन पाहताना जाणवत आहे. जा आणि मेहनत करून पुन्हा नव्याने प्रेझेंटेशन सादर करा, असा शब्दांत मोदींनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. याआधी आरोग्य, स्वच्छता व नागरी विकास मंत्रालयातील अधिकारी प्रेझेंटेशन करीत असतानाही मोदी निघून गेले होते, असे सांगण्यात आले.