'नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या ISI ला पठाणकोटमध्ये पिकनिक करु दिली'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 03:04 PM2017-12-12T15:04:52+5:302017-12-12T15:18:05+5:30
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत ढोगींपणा करत असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली - गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत ढोगींपणा करत असल्याचा आरोप केला आहे. 'नरेंद्र मोदींनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पठाणकोट एअरबेसमध्ये पिकनिक करु दिली', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींनी पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतरही आयएसआयच्या अधिका-यांना घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी बोलावण्यावरुन सुनावलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण नसतानाही पाकिस्तानात नवाज शरिफ यांच्या घरी जाण्यावरुन आणि शपथविधीला निमंत्रण देण्यावरुनही टीका केली आहे.
He goes uninvited to Pakistan,allows it’s notorious agency ISI to picnic in our sensitive Pathankot airbase, calls Pakistan PM in oath ceremony, gifts him generously still Pakistan is bad.If you hate Pakistan then Why don’t you end Most Favoured Nation status given to Pakistan?
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) December 11, 2017
लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ही टीका केली आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असून काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानी नेत्यांची भेट घेतल्याचा आरोप केला होता.
पालनपूर येथील एका सभेत बोलताना मोदी म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ काय? ते म्हणाले की, काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानी नेत्याशी चर्चा केल्याच्या एका दिवसानंतर आपल्याला ‘नीच’ म्हटले होते.
मोदी म्हणाले की, मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत मीडियात वृत्त होते. या बैठकीस पाकिस्तानचे उच्चायुक्त, पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री, भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते. अय्यर यांच्या निवासस्थानी तीन तास ही बैठक चालली. त्याच्या दुस-याच दिवशी अय्यर म्हणाले की, मोदी नीच आहेत. हे गंभीर प्रकरण आहे. अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनविण्याचे समर्थन रफीक यांनी केले होते. मोदी म्हणाले की, एकीकडे पाकिस्तानी सैन्याचे माजी डीजी गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे लोक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर गुजरातमधील जनता, मागास वर्ग, गरीब लोक आणि मोदी यांचा अपमान केला जात आहे. काँग्रेसने देशाच्या जनतेला हे सांगायला हवे की, काय योजना आखली जात आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने हताश नरेंद्र मोदी काँग्रेस पक्ष व त्याच्या नेत्यांविरुद्ध धादान्त खोटे आरोप करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु याने आपण पंतप्रधानांच्या उच्च पदाची अप्रतिष्ठा करीत आहोत, याचेही त्यांना भान नसावे याची कीव वाटते, असे जोरदार प्रत्युत्तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी दिले.