तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 06:14 PM2018-10-12T18:14:15+5:302018-10-12T18:18:56+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल
लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात व्हायला हवी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार एससी-एसटी कायदा आणि तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश काढतं. मग त्यांनी राम मंदिराबद्दलही अध्यादेश काढावा, असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला.
अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बांधण्यात आलेल्या अतिथीगृहात थांबलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकाराला लक्ष्य केलं. 'केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. इतकंच काय, राष्ट्रपती भवनातही भाजपाची सत्ता आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मंदिर उभारलं नाही, तर मग कधी उभारणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तिहेरी तलाकविरोधात अध्यादेश आणणाऱ्या मोदी सरकारवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. 'एससी-एसटी कायदा, तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश आणता. मग राम मंदिरासाठी अध्यादेश का काढला जात नाही?,' असा प्रश्न त्यांनी विचारला. अयोध्येत आजही राम तुरुंगात आहेत. त्यांना जास्त काळ या स्थितीत ठेवता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं. लवकरच सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेवरदेखील त्यांनी भाष्य केलं. आस्थेचा निर्णय न्यायालयात होऊ शकत नाही. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय कोणी मान्यदेखील करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणात अध्यादेश काढावा, असं ते म्हणाले.