जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे
By admin | Published: December 19, 2014 09:46 AM2014-12-19T09:46:19+5:302014-12-19T12:27:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगेकूच सुरुच असून जपानमधील एका रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे सर्वाधिक परफोर्मिंग नेते ठरले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगेकूच सुरुच असून जपानमधील एका रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे सर्वाधिक परफोर्मिंग नेते ठरले आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
टोकियोतील एका रिसर्च कंपनीने जगातील टॉप ३० परफोर्मिंग नेत्यांची यादी तयार केली आहे. या यादीत ३० देशांमधील सुमारे २६ हजार जणांची मतं जाणून घेण्यात आली. यात आशियातील १२, आफ्रिका आणि अमेरिका खंडातील प्रत्येकी चार, युरोपमधील आठ, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपंग १० पैकी ७.५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर मोदी ७.३ गुणांसह दुस-या तर जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मार्केल ७.२ गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ६.६गुणांसह चौथ्या, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन ६.५ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन ६ गुणांसह सर्वात तळाला आहेत.
देशांतगर्त आणि परराष्ट्रविषयक प्रश्नांसंदर्भात जनतेचा देशाच्या सर्वोच्च नेत्यावर किती विश्वास आहे यावर देखील सर्वेक्षण करण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यामध्येही बाजी मारली आहे. देशांतर्गत प्रश्नांमध्ये ९४ टक्के लोकांनी आणि परराष्ट्रविषयक प्रश्नांमध्ये ९३ टक्के लोकांनी जिनपिंग यांच्या बाजूने कौल दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा क्रमांक लागला आहे.