CM भगवंत मान यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा, दोघांमध्ये रंगला कलगितुरा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:18 PM2022-08-24T19:18:16+5:302022-08-24T19:19:30+5:30
पंजाबच्या मोहालीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होमी भाभा कँसर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन झाले.
मोहाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंजाबच्या मोहाली येथे होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील मंचावर उपस्थित होते. यावेळी भगवंत मान यांचे भाषण सुरू असताना जमावाने मोठमोठ्याने मोदी-मोदीच्या घोषणा सुरू केल्या. यानंतर मान यांनी मोदींना आवाहन केले आणि NITI आयोगाच्या बैठकीत पंजाबसाठी केलेल्या मागण्यांची आठवण करुन दिली.
भगवंत मान म्हणाले, 'आज पंतप्रधान खूप दिवसांनी पंजाबमध्ये आले आहेत. आज ते पंजाबसाठी मोठ्या घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.' मात्र पंतप्रधानांनी भाषणादरम्यान अशी कोणतीही घोषणा केली नाही आणि भगवंत मान यांचा अपेक्षा भंग केला. जिथे भगवंत मान यांनी स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा वाढवण्यासाठी मोहल्ला क्लिनिकसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भाष्य केले, तिथे पंतप्रधानांनी प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यावर जोर दिला.
Speaking at inauguration of Homi Bhabha Cancer Hospital & Research Centre in Mohali, Punjab. https://t.co/llZovhQM5S
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2022
त्या घठनेबद्दल व्यक्त केला खेद
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 5 जानेवारी रोजी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला रोखल्याच्या प्रकरणावर खेद व्यक्त केला. 'पंजाबमध्ये असे सरकार आले आहे, पंतप्रधानांचा मान राखतात. पंजाबमध्ये अशा घटना पुन्हा कधीही घडणार नाहीत. पंतप्रधानांचे पंजाबमध्ये कधीही स्वाग असेल,' असे मान म्हणाले.
काय आहेत हॉस्पिटलची खासियत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, टाटा मेमोरियल सेंटरने 660 कोटी रुपये खर्चून बांधले आहे. हे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत अनुदानित संस्था आहे. हे कर्करोग रुग्णालय 300 खाटांची क्षमता असलेले तृतीय श्रेणीचे रुग्णालय आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगावरील उपचारांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त हे रुग्णालय आहे.