Narendra Modi: १९८४ च्या काँग्रेसच्या लाटेत आम्ही संपलोच होतो, पण... नरेंद्र मोदींनी सांगितला तो किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:37 PM2023-03-28T21:37:13+5:302023-03-28T21:38:27+5:30
Narendra Modi: मोदींनी १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीत उसळलेल्या काँग्रेसच्या लाटेत झालेल्या पराभवाच्या आठवणींनाही उजाळा दिला.
आज भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयाच्या विस्तारीत कार्यालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यालयाचे बांधकाम करणाऱ्या सर्व कामगारांची भेट घेतली. तसेच उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मोदींनी १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीत उसळलेल्या काँग्रेसच्या लाटेत झालेल्या पराभवाच्या आठवणींनाही उजाळा दिला.
मोदी म्हणाले की, १९८४ च्या दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्यावेळी भावनात्मक सहानुभूतीचे वातावरण होते. त्या वादळात आम्ही जवळपास संपूनच गेलो होतो. मात्र आम्ही आशा सोडली नाही. आम्ही जमिनीवर काम केलं आणि संघटना भक्कम केली.
मोदी म्हणाले की, भाजपा तो पक्ष आहे ज्याने आणीबाणीवेळी आपल्या पक्षाची आहुती दिली. भाजपा तो पक्ष आहे, ज्याने लोकसभेच्या दोन जागांवरून सुरुवात केली होती. आज आम्ही ३०३ जागा असलेला पक्ष आहोत. आज अनेक राज्यांमध्ये आम्हाला ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळतात. आज उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिमेपर्यंत भाजपा एकमेव पॅन इंडिया पक्ष आहे.
कुटुंबांकडून चालवल्या जाणाऱ्या पक्षांमध्ये भाजपा हा असा पक्ष आहे, जो तरुणांना पुढे येण्याची संधी देतो. आज भारताच्या माता भगिनींचा आशीर्वाद भाजपासोबत आहे. आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्षच नाही, तर सर्वात फ्यूचरिस्टिक पक्षही आहे, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.