Narendra Modi : “आम्ही जो विचार केला होता तो...”; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेला आलेल्या लोकांची मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:29 PM2024-04-02T13:29:56+5:302024-04-02T13:39:28+5:30
Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी जाहीर सभेला आलेल्या लोकांची माफी मागितली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी जाहीर सभेला आलेल्या लोकांची माफी मागितली. मी तुमची माफी मागतो, असं मोदी म्हणाले. “आम्ही लोकांनी जो विचार केला होता, त्यापेक्षा मंडप खूप लहान पडलं. जितके लोक मंडपात आहेत. त्यापेक्षा जास्त लोक हे बाहेर आहेत. आमच्या व्यवस्थेतील त्रुटींबद्दल मी माफी मागतो.”
“मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही आता उन्हात उभे आहात, तुमची ही तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही. मी विकास करून परत येईन. उत्तराखंडच्या जनतेच्या विजेचं बिल शून्य झालं पाहिजे. यासाठी पंतप्रधान सौरऊर्जा कार्यक्रमांतर्गत काम केलं जाईल. मी जेव्हाही उत्तराखंडच्या पवित्र भूमीत येतो तेव्हा मला खूप धन्य झाल्यासारखं वाटतं. देवभूमीचे ध्यान केल्याने मी नेहमी धन्य होतो, हे माझे भाग्य आहे, मी सलाम करतो.”
पंतप्रधान म्हणाले की, मोदींच्या गॅरेंटीमुळे उत्तराखंडमधील प्रत्येक घरात सुविधा पोहोचली आहे आणि लोकांचा स्वाभिमान वाढला आहे. आता तिसऱ्या टर्ममध्ये तुमचा मुलगा आणखी एक मोठं काम करणार आहे. तुम्हाला 24 तास वीज मिळेल, वीज बिल शून्य होईल आणि विजेपासून पैसेही मिळतील. यासाठी मोदींनी 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' सुरू केली आहे.
भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याची गँरेंटी दिली आहे. तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद म्हणजे लोकांचे उत्पन्न वाढेल. नोकरीच्या संधी वाढतील. खेड्यापाड्यात आणि शहरात सोयी वाढतील. मोदी हे मौजमजा करण्यासाठी जन्माला आलेले नाहीत, मोदी कष्ट करण्यासाठी जन्माला आले आहेत. मोदींचा जन्म तुमच्यासाठी मेहनत करण्यासाठी झाला आहे” असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.