केवडियात पर्यटन योजनांचे नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:18 AM2020-10-31T04:18:46+5:302020-10-31T04:19:44+5:30
Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी केवडियात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यटनाशी संबंधित अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदीगुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी केवडियात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यटनाशी संबंधित अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले.
अहमदाबादेत पोहोचल्यानंतर त्यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल आणि गुजराती सिनेमातील सुपरस्टार नरेश कनोडिया आणि त्यांचे संगीतकार भाऊ महेश कनोडिया यांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री विजय रुपानी, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि प्रदेश भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी मोदी यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी हे विमानतळाहून थेट केशूभाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गांधीनगरला गेले. तिथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोदी यांनी केशूभाई यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करीत त्यांना पितातुल्य संबोधले होते.
मोदी यांनी नंतर कनोडिया बंधूंना श्रद्धांजली अर्पण केली. नरेश आणि महेश कनोडिया हे भाजपशीही संबंधित होते आणि संसद सदस्य व आमदार राहिले होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आपल्या आईचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्चमध्ये कोरोनाच्या साथीनंतरचा मोदी यांचा गुजरातचा हा पहिला दौरा आहे.
दोन दिवसांचा गुजरात दौरा
दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी येथे एकता क्रूज सेवेचे उद्घाटन केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह त्यांनी येथे फेरफटका मारला. हा प्रवास ४० मिनिटात पूर्ण होतो. एका नावेत २०० प्रवासी बसू शकतात. मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ आरोग्य वन, एकता मॉल, मुलांसाठीच्या पार्कचे उद्घाटन केले.