"मोदी भाजपाचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत...", फारुख अब्दुल्लांनी केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 07:14 PM2024-03-09T19:14:34+5:302024-03-09T19:15:39+5:30
Farooq Abdullah : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांचा सूर बदलताना दिसत आहे.
Farooq Abdullah : आगामी लोकसभा निवडणुकीबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकाही होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आयोगाचे एक पथकही जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले असून याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांचा सूर बदलताना दिसत आहे.
नुकतेच सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी अखिलेश यादव यांच्या विधानाचा विरोध केला आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले, "मला माहित नाही की, अखिलेश यादव काय म्हणाले आणि कोणत्या परिस्थितीत ते म्हणाले. जोपर्यंत पंतप्रधानांचा सवाल आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधान नाहीत. ते पंतप्रधान बनले, त्यांनी प्रत्येक भारतीयाचे प्रतिनिधित्व केले आहे. पंतप्रधान मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि ज्यांचा भारतात कोणताही धर्म नाही अशा लोकांचेही प्रतिनिधित्व करतात. ते आमचे पंतप्रधान आहेत."
दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर खोऱ्यातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन आणि सांगलदान स्टेशन ते बारामुल्ला स्टेशन दरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते आणि त्यांचे कौतुकही केले होते. फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, आम्हाला याची गरज आहे. आपल्या पर्यटनासाठी आणि लोकांसाठी ते महत्त्वाचे आहे. सरकारने उचललेले हे पाऊल आपल्या पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाचे होते. याबद्दल मी रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५३ विकास प्रकल्पांची केली घोषणा
जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी ६ हजार ४०० कोटी रुपयांच्या तब्बल ५३ विकास प्रकल्पांची घोषणा केली. अनेक प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा आता बदलणार आहे.