VIDEO: इटली दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी माही गुरुजींशी मराठीत बोलतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:41 PM2021-10-29T19:41:14+5:302021-10-29T20:00:22+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटली दौऱ्यावर आहेत. रोममध्ये दाखल होताच मोदींचे भारतीयांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर इटलीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी राजधानी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. यानंतर मोदींचे भारतीय समुदायाने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी काही महिलांनी संस्कृतमधून श्लोक म्हटले. विशेष म्हणजे, यावेळी नरेंद्र मोदींनीइटलीत वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या माही गुरुजींशी चक्क मराठीत आणि त्यानंतर एका महिलेने मोदींना 'केम छो...' म्हटल्यावर तिच्याशी गुजरातीमध्ये संवाद साधला.
इटली दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी माही गुरुजींशी मराठीत बोलतात तेव्हा...#NarendraModipic.twitter.com/KTTUgd011U
— Lokmat (@lokmat) October 29, 2021
कोण आहेत माही गुरुजी ?
माही गुरुजी उर्फ महिंद्र सिरसाठ हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील साहेबराव सिरसाठ हे नागपूर पोलिस दलात एएसआय पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचे कुटुंब सीताबर्डी येथील क्वार्टरमध्ये राहत होते. 25 वर्षांपूर्वी काही कामानिमित्त ते इटलीला गेले होते. त्यावेळी या देशातही भारतीय संस्कृती व आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रचार करावा, असा साक्षात्कार त्यांना झाला. तेव्हापासून त्यांनी भारत सोडून इटलीला आपले कार्य सुरू केले. मागील 25 वर्षांपासून इटलीच नाही तर युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीसह योग आणि अध्यात्माचा प्रचार, प्रसार करत आहेत.
कोरोना पीडितांसाठी योग
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात इटली देश सर्वाधिक प्रभावित झाला होता. मात्र, त्यावेळी माही गुरुजी यांच्या केंद्रातील साधक या जीवघेण्या आजारापासून सुखरूप होते. योग आणि आयुर्वेदामुळे कोरानापासून सुरक्षित राहत असल्याचा संदेश त्यांनी दिला व या काळात इटलीतील नागरिकांची योग प्रशिक्षणाद्वारे सेवा केली होती.
इटलीमध्ये G20 शिखर परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत जी-2- परिषदेसाठी गेले आहेत. जी-20 ची बैठक गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलावी लागली. आता ही परिषद रोममध्ये होत आहे. G20 ला 'वर्ल्ड इकॉनॉमिक इंजिन' असेही म्हणतात. या गटाची ही आठवी बैठक असेल. पंतप्रधान 31 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत रोममध्ये असतील. त्यानंतर ग्लासगोला रवाना होतील.
इटलीवरुन ब्रिटनला जाणार
पंतप्रधान मोदी 31 ऑक्टोबरला इटलीहून ब्रिटनला रवाना होणार आहेत. येथे ते ग्लासगो, स्कॉटलंड येथे होणाऱ्या COP26 क्लायमेट चेंज समिटमध्ये भाग घेतील. हवामान बदलावरील ही 26वी शिखर परिषद आहे. ही इटली आणि ब्रिटन यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. या परिषदेत 120 देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.