Narendra Modi Live: देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:09 PM2024-06-04T21:09:34+5:302024-06-04T21:10:42+5:30

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यावेळी पु्न्हा एकदा देशात एनडीए सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Narendra Modi Live: The country is about to make a big decision; Narendra Modi hints at becoming Prime Minister for the third time | Narendra Modi Live: देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत

Narendra Modi Live: देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत

नवी दिल्ली - आमचे विरोधक एकत्र येत इतक्या जागा जिंकू शकल्या नाहीत ज्या भाजपाने एकट्याने जिंकल्या आहेत. मी देशातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना सांगतो, नागरिकांना सांगतो, तुमची मेहनत ही मोदींना निरंतर काम करण्याची प्रेरणा देते. आपण सगळे मिळून पुढे जाऊ, देशाला पुढे घेऊन जाऊ. तिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार आहे. ही मोदींची गॅरंटी आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 

भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोदी भाजपाच्या मुख्य कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, मी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे अभिनंदन करतो. प्रत्येकाच्या सक्रीय सहभागाशिवाय ही निवडणूक प्रक्रिया शक्य नाही. या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदाच एखादं सरकार त्यांचा २ कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा पुन्हा आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी विधानसभेचे निकाल लागले तिथे एनडीएला स्पष्ट विजय मिळाला. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम या राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. डिपॉझिट वाचवणंही त्यांना कठीण झालं असा टोला मोदींनी लगावला. तसेच तुमच्या या प्रेमासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. आज पुन्हा एनडीएची सलग तिसऱ्यांदा सरकार बनणं निश्चित आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत. देशवासियांनी भाजपावर,एनडीएवर पूर्ण विश्वास दाखवला. आजचा विजय देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. सबका साथ, सबका विश्वास या मंत्राचा विजय आहे. १४० कोटी जनतेचा विश्वासाचा विजय आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

तसेच ओडिशात लोकसभा निवडणुकीत भाजपानं चांगली कामगिरी केली. तिथे भाजपाचं सरकार बनणार आहे. तिथे पहिल्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री बनणार आहे. भाजपानं केरळातही जागा मिळवली. केरळच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलंय. अनेक पिढ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अनेक पिढी ज्या क्षणाची वाट पाहिली आज ते यश मिळालं आहे. तेलंगणात आपली संख्या दुप्पट झाली. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाने क्लीन स्वीप मिळवलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 

दरम्यान, आंध्र प्रदेशात चंदाबाबू नायडू आणि बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली. १० वर्षापूर्वी देशात बदल हवा होता म्हणून जनतेनं आपल्याला कौल दिला. त्यावेळी देशात नैराश्य होतं. अशावेळी देशानं आपल्याला जबाबदारी दिली होती. आपण पूर्ण प्रामाणिकपणे काम केले, २०१९ ला याच प्रयत्नांवर विश्वास ठेवत देशाने पुन्हा दुसऱ्यांदा बहुमत दिले.  २०२४ ला पुन्हा जो आशीर्वाद एनडीएला मिळाला आहे. त्याबद्दल जनतेसमोर मी विनम्रतेने नतमस्तक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक 

आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक करणारा आहे. माझी आई गेल्यानंतर ही माझी पहिलीच निवडणूक होती. परंतु देशातील कोट्यवधी माता भगिनींनी आईची कमी मला भासवून दिले नाही. या आपलेपणाला मी शब्दात मांडू शकत नाही. देशातील माता भगिनींनी मला नवीन प्रेरणा दिली. मागील १० वर्षात देशाने खूप मोठे निर्णय घेतले. राष्ट्र प्रथमची भावना आम्हाला असामान्य काम करण्याची प्रेरणा देते. जगातील सर्वात मोठ्या जनकल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. १२ कोटी जनतेला नल से जल दिलं. ४ कोटी गरिबांना पक्की घरे दिली. ८०  कोटी जनतेला मोफत रेशन दिले. याच भावनेतून जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवलं. आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. कोरोनाचं संकट आलं तेव्हा देशहित आणि जनहिताचे निर्णय आम्ही घेतले. आज भारत जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. राष्ट्र प्रथमची भावना भारताला आत्मनिर्भर बनवणार आहे. विकसित भारताचा संकल्प आमचा आहे. १० वर्षानंतर सलग तिसऱ्यांदा जनतेचा आशीर्वाद आपल्याला ताकद देतोय. संकल्पाला नवीन ऊर्जा देते असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. 

निवडणूक आयोगाचे मानले आभार 

मी देशाच्या निवडणूक आयोगाचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी निवडणूक कुशलतेने संपन्न केली. ११ लाख मतदान केंद्र, १.५ कोटी निवडणूक कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम मशिन, इतक्या उन्हाळ्यातही निवडणूक आयोगाने त्यांची जबाबदारी सांभाळली. भारताची निवडणूक प्रक्रिया, पूर्ण सिस्टम आणि निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कामावर भारतीयांना गर्व आहे असं म्हणत मोदींनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. 

Web Title: Narendra Modi Live: The country is about to make a big decision; Narendra Modi hints at becoming Prime Minister for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.