घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 01:47 PM2024-10-27T13:47:21+5:302024-10-27T13:48:38+5:30

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात डिजिटल अटकेपासून बचावाची माहिती दिली.

Narendra Modi Man ki Baat : PM Modi raised awareness about digital arrest | घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि. 27) 115 व्या 'मन की बात' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या डिजिटल अरेस्टच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि लोकांना जागरुक केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये पोलिसांचे कपडे घातलेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने चौकशी करत आहे आणि त्याला आधार कार्ड दाखवण्याची मागणी करतोय.

डिजिटल अरेस्टवर पीएम मोदींनी केले जागरुक
डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील लोक डिजिटल अटकेचे बळी ठरत आहेत. भीतीपोटी अनेकजण आपल्या कष्टाने कमावलेले पैसे या ऑनलाईन गुन्हेगारांना देत आहेत. लोकांना जागरुक करत पीएम मोदी म्हणाले की, तुम्हाला कधी असा फोन आला तर घाबरू नका. तपास यंत्रणा कधीही अशाप्रकारचे फोन किंवा व्हिडिओ करत नाहीत. तमाम भारतीयांना अशा घोटाळ्यापासून सावध राहावे.

डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे
कायद्यात डिजिटल अटकेसारखी कोणतीही व्यवस्था नाही, ही फसवणूक, खोटेपणा आहे. डिजिटल अटकेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी सर्व तपास यंत्रणा राज्य सरकारांसोबत एकत्र काम करत आहेत. पीएम मोदींनी यावेळी डिजिटल अटकेपासून बचावाचे तीन टप्पे सांगितले. 

  1. थांबा/शांत राहा
  2. विचार करा
  3. योग्य कारवाई करा

 

पंतप्रधान म्हणाले की, असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा, घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा. दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही. तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून घ्या की काहीतरी चुकीचे आहे. शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, तिसरा टप्पा म्हणजे योग्य कारवाई. अशाप्रकारचे फोन आल्यावर नॅशनल सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा. तसेच सायबर क्राईम वेबसाइटवर अहवाल द्या. कुटुंब आणि पोलिसांना कळवा.

अशी केली जाते डिजिटल अरेस्ट
डिजिटल अटक घोटाळ्याची सुरुवात एका अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलने होते. हा ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल असू शकतो. पीडितेला अज्ञात क्रमांकावरून कॉल किंवा व्हिडिओ कॉल येतो आणि त्यांना बनावट पार्सल, मोबाईल क्रमांक बंद करणे किंवा बनावट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची माहिती दिली जाते. यानंतर, त्यांना बनावट अटक किंवा बनावट वॉरंट दाखवले जाते. यानंतर त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशाप्रकारे हजारो, लाखो रुपये उकळले जातात.

तक्रार कशी करायची?
पीएम म्हणाले की, अशी फसवणूक करणारे हजारो व्हिडिओ आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. लाखो सिमकार्ड आणि बँक खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत. एजन्सी त्यांचे काम करत आहेत, परंतु डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारे घोटाळे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जागरूकता खूप महत्त्वाची आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, तुमच्यासोबत झालेला घोटाळा #SAFEDIGITALINDIA हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जागरूक करा. डिजिटल अटक घोटाळा किंवा इतर सायबर फसवणुकीबद्दलच्या तक्रारी नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (cybercrime.gov.in/) किंवा हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून नोंदवल्या जाऊ शकतात. 

Web Title: Narendra Modi Man ki Baat : PM Modi raised awareness about digital arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.