Narendra Modi: कोविडकाळात मोदींनी जमिनीवरचं काम केलंय, खा. राणांकडून पंतप्रधानांचं कौतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:42 PM2022-02-09T16:42:21+5:302022-02-09T16:43:34+5:30
खासदार राणा यांनी मोदींवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी पालखी मार्ग महराष्ट्रात दिला.
नवी दिल्ली - लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केल्याचा आरोप केला. कोरोना देशभरात काँग्रेसने पसरविल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपामुळे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मोदींवर टीका केली. मात्र, आता खासदार नवनीत राणा यांनी मोदींची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे.
खासदार राणा यांनी मोदींवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी पालखी मार्ग महराष्ट्रात दिला. 12,294 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे, ज्या मार्गाचा वापर देशातील सर्वच भक्त आणि महाराष्ट्राची जनता भविष्यात करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या पालखीमार्गाचे भूमीपूजन झाले. समृद्धी महामार्गालाही केंद्र सरकारने पैसे दिले, नागपूर-मुंबईला जोडणार हा मार्ग आहे. 701 किमीचा हा रस्ता असून अंदाजे 55 हजार कोटी रुपये यासाठी खर्च येणार आहे. या रस्त्याचं काम केंद्र सरकारने केलं आणि नाव देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केल्याचं राणा यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात नवीन रेल्वे लाईन, अनेक मेट्रो प्रोजेक्टही सरकारने केले. उडान योजनेंतर्गत आता नुकतेच सिंधुदुर्गात विमानतळ बनविण्यात आले आहे. नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही उद्घाटन झाले आहेत. पंतप्रधानांनी कोविड काळात हात वर नाहीत केले, तर जमिनीवरचं काम केलंय. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी केवळ आरोप केले, ते शेतकऱ्यांवर बोलले नाहीत, ते गरिबांबाबत बोलले नाहीत, ना घरकुलबाबत बोलले, ना इंडस्ट्रीबाबत बोलले, असे म्हणत शिवसेनेवरही हल्लाबोल केला.
काँग्रेसचा तीव्र संताप
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संसदेत करोना प्रसाराबाबत काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन' करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. तर, अमरावतीतही काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसून आलं. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी कोविड काळातील कामाचे फोटो शेअर करत मोदींना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले होते मोदी
पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला.