... त्यांना मोदींनीच सांगितलं असावं, शेवाळेंच्या गौप्यस्फोटावर राऊतांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:06 PM2022-07-19T20:06:32+5:302022-07-19T20:07:20+5:30
उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडीवेळीही सर्वांना विश्वासात घेतलं होतं
मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. शिवसेना खासदारांनी संजय राऊत यांच्यामुळेच युतीची चर्चा फिस्कटल्याचे सांगितले. तसेच, युतीसंदर्भात मौठा गौप्यस्फोटही केला होता. आता, या गौप्यस्फोटावर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडीवेळीही सर्वांना विश्वासात घेतलं होतं, त्यावेळी या सर्वांनी निर्णयाचं स्वागत केलं होतं. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात बंद खोलीत जी चर्चा झाली, त्यातील बराचसा भाग उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितला होता. ठाकरे कुटुंब आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. त्यामुळे, जो कोणी हा गौप्यस्फोट केलाय, त्यांना अधिक माहिती असेल. किंवा मोदींनीच त्यांना ही माहिती सांगितली असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या गौप्यस्फोटावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपामुळेच युती तुटली
शिवसेना-भाजपा युती तुटण्यास शिवसेना जबाबदार नाही. सन 2014 आणि 2019 मध्ये युती ही भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही. त्यावेळी, हे सर्व खासदार कुठं होते, असेही संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टिका झाली. त्यावेळी, हे सर्व खासदार कुठे होते. त्यांनी या टिकेला प्रत्युत्तर का दिले नाही. पण, या टिकाकारांवर आम्ही तुटून पडलो, आम्ही पक्षाची भूमिका मांडली, असेही संजय राऊत यांनी म्हटलं.
राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत युतीसाठी आग्रही होते. पण, खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला असा घणाघाती आरोप राहुल शेवाळे यांनी केला. विशेष म्हणजे युतीसाठी उद्धव ठाकरे जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तासभर चर्चाही केली होती. मात्र, पुढच्या जुलै महिन्यात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे, ही बोलणी पुढे सरकलीच नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.