NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 04:13 PM2024-06-07T16:13:22+5:302024-06-07T16:14:57+5:30
बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीदेखील भेट घेतली.
Narendra Modi NDA Meeting : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी(दि.7) दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक झाली आणि त्यात सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतेपदी निवड केली. यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला आणि आपल्या समर्थक खासदारांची यादी सोपवली. तत्पुर्वी मोदींनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे घर गाठले.
#WATCH | PM Narendra Modi meets Bharat Ratna and veteran BJP leader LK Advani at the latter's residence in Delhi. pic.twitter.com/fZtIlOj5yw
— ANI (@ANI) June 7, 2024
शुक्रवारी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाली. यानंतर त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याशिवाय, त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीदेखील भेट घेतली. विशेष म्हणजे, मोदी वेळोवेळी अडवाणी आणि जोशींना भेटायला जातात. यापूर्वी अडवाणींना भारतरत्न देण्यात आला तेव्हा मोदीही त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
#WATCH | PM Narendra Modi meets veteran BJP leader Murli Manohar Joshi at the latter's residence, in Delhi pic.twitter.com/7yuTbEZB54
— ANI (@ANI) June 7, 2024
9 जून रोजी शपथविधी
आज सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर रविवार, 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यासाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या शपथविधीसोबतच मोदी सलग तीन वेळा पंतप्रधान होणारे देशाचे दुसरे नेते ठरणार आहेत.
#WATCH | PM Narendra Modi meets former President Ram Nath Kovind, in Delhi
PM Modi was chosen as the leader of the NDA Parliamentary Party today. pic.twitter.com/8GI6p5lwUX— ANI (@ANI) June 7, 2024
नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे विरोधक सातत्याने टीका-टिप्पणी करत आहेत. त्या सर्व टीकांना पंतप्रधानांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, ''आम्हाला कमी जागेवरुन बोलले जात आहे, पण काँग्रेसला दहा वर्षांनंतरदेखील शंभर जागांचा आकडा गाठता आलेला नाही. 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये मिळून जेवढ्या जागा त्यांना मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा यंदा आम्हाला मिळाल्या आहेत. भविष्यात त्यांचा आकडा खूप वेगाने खाली येणार आहे. हे लोक आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांना मान देत नाहीत,'' असा टोला मोदींनी यावेळी लगावला.
निवडणुकीपूर्वी विरोधक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत होते. याबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, "4 जूनपूर्वी हे लोक (इंडिया आघाडी) सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. या लोकांचा भारतातील लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडाला होता. मात्र 4 जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही,'' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.