जनतेने आमच्या कामांची पावती दिली, त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हेच आमचे ध्येय! पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 05:57 AM2019-06-26T05:57:45+5:302019-06-26T05:58:04+5:30
आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे
नवी दिल्ली : आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी यापुढेही आपण प्रयत्न करीत राहू, असा दावा मंगळवारी लोकसभेत केला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी महामार्ग, चांद्रयान मोहीम, स्टार्टअप्स आदी विकासाच्या योजनांद्वारे आमच्या सरकारने देशाच्या आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे, असे सांगून आमची देशातील जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हेच आमचे स्वप्न आहे, असे आम्ही मानतो, असेही प्रतिपादन केले. तसेच मेक इन इंडियाचा उल्लेख करीत, या योजनेची टिंगलटवाळी करणे अयोग्य आहे, असे नमूद केले.
यंदा प्रथमच स्थापन केलेल्या जलशक्ती मंत्रालयाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, देशाला जलसंकटातून बाहेर काढण्यासाठी या मंत्रालयातर्फे प्रयत्न केले जातील. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे त्याकडे आमचे सरकार विशेष लक्ष देणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर आम्ही ठाम आहोत आणि येत्या काही वर्षांत आम्ही ते करून दाखवू. मात्र, त्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या शेतीतून शेतकऱ्यांनाही बाहेर पडायला हवे. त्यासाठीही आम्ही विशेष योजना आणणार आहोत.
कोणाचे संख्याबळ किती आहे, हे महत्त्वाचे नसून, सर्वांनीच देशाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी विरोधकांना, त्यातही विशेषत: काँग्रेस सदस्यांना उद्देशून केले. निवडणुकांतील विजय आणि पराभवाच्या पलीकडे आपण पाहायला हवे आणि देशातील १३0 कोटी जनतेसाठी
सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक भारतीयाला घर आणि प्रत्येक घरात शौचालय या योजनेवर पंतप्रधानांनी भाषणात भर दिला. महिलांना अडचणीच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक घरात शौचालय आवश्यक आहे, असे सांगताना मोदी यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत डॉ. राम मनोहर लोहिया यांनी याचा उल्लेख केला होता आणि त्यांनी म्हटले होते, ते काम पूर्ण केले जाईल, असा दावा केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक विधान वा योजनेचा पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख तर केलाच, पण त्यांनी अनेक वक्त्यांनी अभिभाषणावरील चर्चेत मांडलेल्या मुद्द्यांनाही स्पर्ष केला. आम्ही इतरांनी केलेल्या कामांचे कौतुक निश्चितच करीत आलो आहोत. पण काहींनी फक्त एकाच घराण्यातील नेत्यांचे कौतुक करता येते. अशा मंडळींनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी केलेल्या भरीव कामाचाही कधी उल्लेख केल्याचे आठवत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
आम्ही कधी बदला घेण्याचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही, पण आमची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कायमच सुरू राहील, असे नमूद करीत पंतप्रधानांनी कोळसा व टू्-जी खटल्यांसंदर्भात केलेल्या उल्लेखांनाही उत्तर दिले.
दोन दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाली आणि त्यात ६0 लोकसभा सदस्यांनी भाग घेतला. याचा उल्लेख करतानाच पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील डॉ. अमोल कोल्हे व डॉ. हीना गावीत यांच्या भाषणातील मुद्द्यांचे आवर्जून कौतुक केले. एवढेच नव्हे, तर एमआयएमचे असउद्दिन ओवेसी यांच्या भाषणातील मुद्द्यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
आम्ही काय आणीबाणी लागू केलेली नाही
काँग्रेसचे लोकसभेतील नेते आधीर रंजन चौधरी यांनी तुम्ही ज्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चोर म्हणत होता, त्याचे काय झाले? आमचे हे दोघे नेते या सभागृहात आहेत, असा टोला पंतप्रधानांना लगावला होता. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी त्याचा अवश्य आनंद घ्यावा. उठसूट कोणालाही तुरुंगात टाकायला आम्ही देशात आणीबाणी लागू केलेली नाही. देशात स्व. इंदिरा गांधी यांनी २५ जून, १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, त्याचा या विधानाला संदर्भ होता. आणीबाणी हा देश व लोकशाहीवरील काळा डाग होता, अशी टीकाही त्यांनी केली.