दुस-या देशाच्या साधनसंपत्तीवर आमचा डोळा नाही : नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:45 AM2018-01-10T03:45:46+5:302018-01-10T03:45:54+5:30
कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.
मोदी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने कट्टरवादाचा मुकाबला केला जाऊ शकतो. जागतिक स्तरावर भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावलेली आहे. कोणत्याही देशासोबत आम्ही आमच्या धोरणाचे मूल्यांकन फायदा व तोटा या दृष्टीने करीत नाही. आम्ही त्याकडे मानवीय मूल्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो. भारताचे विकासाचे मॉडल हे एका हाताने घ्या, दुसºया हाताने द्या अशा विचारांवर आधारित नाही. तर, संबंधित
देशाची गरज आणि प्राधान्य यांवर अवलंबून आहे.
भारतीय वंशाच्या संसद सदस्यांचे हे पहिलेच संमेलन आहे. भारतीय वंशाच्या लोकांचा दिवस साजरा करणे २००३ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. महात्मा गांधी हे ९ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यामुळे हा दिवस भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी साजरा केला जातो.
या संमेलनाला २२ देशांतील
१२४ लोकप्रतिनिधी तसेच १५
महापौर आाले होते. त्यात अमेरिकेतील दोन महापौरही होते. इंग्लंडमधून १५, न्यूझीलंडमधून ३, कॅनडातून ५ लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गियानातूने भारतीय वंशाचे २० लोकप्रतिनिधी आले होते, तर स्वित्झर्लंडमधून १, मॉरिशसमधून
११, सूरिनाममधून ९ लोकप्रतिनिधी हजर होते.
केनिया, फिलापाइन्स, पोर्तुगाल, टांझानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतूनही भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधीही आले होते. सार्कपैकी केवळ श्रीलंकेतून भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आले होते. पाकिस्तान व बांगलादेशातून कोणीही उपस्थित नव्हते.
तीन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूक
मोदी म्हणाले की,
देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीतील अर्धी
गुंतवणूक गेल्या तीन वर्षात झाली आहे. मागील वर्षी देशात रेकॉर्ड १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.
या तीन - चार वर्षात भारतात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतीय लोकांच्या आशा अपेक्षाही वाढल्या आहेत. देशातील हे परिवर्तन अनेक क्षेत्रात दिसून येत आहे.