मी नरेंद्र दामोदरदास मोदी..., पंतप्रधानपदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:21 AM2024-06-10T07:21:39+5:302024-06-10T07:22:23+5:30

Narendra Modi Oath Ceremony :लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला.

Narendra Modi Oath Ceremony : I, Narendra Damodardas Modi..., took oath as Prime Minister for the third time | मी नरेंद्र दामोदरदास मोदी..., पंतप्रधानपदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ

मी नरेंद्र दामोदरदास मोदी..., पंतप्रधानपदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ

 नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासह एकूण ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली.

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपप्रणीत एनडीए आघाडीने बहुमत प्राप्त केले. त्यानंतर झालेल्या एनडीए संसदीय नेत्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार रविवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा शपथविधी पार पडला. सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

महाराष्ट्राचा टक्का घसरला
गेल्यावेळी महाराष्ट्रातील ८ मंत्री होते. त्यापैकी नारायण राणे, डॉ. भागवत कराड यांना यंदा स्थान मिळाले नाही. रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांचा पराभव झाल्याने त्यांचा विचार झाला नाही. यंदा राज्यातील ६ जणांचाच समावेश झाला आहे.

कॅबिनेटच्या मागणीमुळे प्रफुल्ल पटेल वेटिंगवर
ज्येष्ठतेनुसार प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्रिपदासाठी पात्र होते. शिंदेसेनेचे सात खासदार असताना प्रताप जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद दिले. एकच खासदार असलेल्या अजित पवार गटाला कॅबिनेटपद दिल्यास नाराजीची शक्यता होती. त्यामुळे पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.
 

Web Title: Narendra Modi Oath Ceremony : I, Narendra Damodardas Modi..., took oath as Prime Minister for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.