Narendra Modi : PM मोदींची यंदाची दिवाळी थेट काश्मीर खोऱ्यात, जवानांचा उत्साह वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:34 PM2021-11-03T17:34:44+5:302021-11-03T17:34:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरी सेक्टरमध्ये येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, सीमारेषेवरील जवानांमध्येही पंतप्रधान मोदींच्या येण्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन वर्षांपासून आपली दिवाळी सैन्यातील जवानांसमवेत साजरी करत असतात. यंदाही जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवर जाऊन ते दिवाळी साजरी करणार आहेत. मोदी हे जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील नौशहरा भागातील जवानांसमवेत दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे सेलिब्रेशन करणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील अत्यंत संवदेनशील भाग असलेल्या नौशहरा कॅम्पमध्ये मोदी येणार आहेत. त्यामुळे, या परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरी सेक्टरमध्ये येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, सीमारेषेवरील जवानांमध्येही पंतप्रधान मोदींच्या येण्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. सध्या जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर शांतता ठेवण्यासाठी सैन्य दलाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मात्र, त्यातही दहशतवादी कारवाया होत असून सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या नापाक हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत सैन्य दलाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. या मोहिमेत दहशतवाद्यांशी लढताना 9 जवानांना वीरमरण प्राप्त झाले.
दरम्यान, गेल्या 4 महिन्यांत सीमारेषेवर 14 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळेच, येथील जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा राजौरी सेक्टरला भेट देऊन दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी, या भागातील सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अद्याप पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
दिवाळी पाडव्याला केदारनाथला
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 5 नोव्हेंबरला केदारनाथ धामचे दर्शन घेणार आहेत. पंतप्रधानांच्या केदारनाथ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान केदारनाथमध्ये सुमारे साडेतीन तास मुक्काम करतील. बाबा केदारनाथांचे दर्शन घेतल्यानंतर ते आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण तसेच पुनर्निर्माण कामांची पाहणी करणार आहेत. मोदींच्या दौऱ्यामुळे रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी मनुज गोयल आणि पोलिस अधीक्षक आयुष अग्रवाल केदारनाथमध्ये तळ ठोकून आहेत.