PM Security: पंतप्रधानांची सुरक्षा राष्ट्रपतींच्या दरबारात; केंद्राकडून कठोर निर्णयाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:03 AM2022-01-07T07:03:46+5:302022-01-07T07:14:28+5:30
पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या राज्याचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले होते. त्याची सविस्तर माहिती नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी भेट घेऊन दिली. सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल राष्ट्रपतींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंजाबमधील घटनेची केंद्रीय गृहखाते माहिती गोळा करीत आहे. या राज्यात घडलेल्या प्रकारानंतर केंद्र सरकार अतिशय मोठे व कठोर निर्णय घेणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.
पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा होणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे.
राष्ट्रपती सचिवालयाने म्हटले आहे की, पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची माहिती मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिली. मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाबद्दल कोविंद यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, पंजाबमध्ये सुरक्षाविषयक जो प्रश्न निर्माण झाला, त्याची भविष्यात पुनरावृत्ती होऊ न देण्याची दक्षता घेतली यावी.
पंजाबमधील घटनेबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत संताप व्यक्त
पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.
सुरक्षा त्रुटीला पंजाब सरकारच जबाबदार : राजनाथसिंह
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात असलेल्या सुरक्षा त्रुटींना तेथील राज्य सरकारच जबाबदार आहे. या चुकीबद्दल काँग्रेसला कधीही माफ करता येणार नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. त्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबत सर्वांनी नेहमीच दक्ष राहिले पाहिजे, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर त्रास सहन केला : सिद्धू
रस्ता रोखला गेल्यामुळे मोदी यांना १५ मिनिटे त्रास सहन करावा लागला, पण अन्यायकारक नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभर यातना भोगाव्या लागल्या आहेत अशी टीका पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणी
n पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्या, तसा प्रकार भविष्यात पुन्हा घडता कामा नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली.
n ही याचिका आज, शुक्रवारी सुनावणीस घेण्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मान्य केले आहे. सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा ज्येष्ठ विधिज्ञ मणिंदरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता.
सरकार पाडण्याचा डाव
पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता असा खोटा प्रचार सुरू आहे. या राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथविण्याचा हा डाव आहे. पंतप्रधान हे देशाचे आदरणीय नेते असतात. पण ती आब न राखता मोदी सवंग पद्धतीने पंजाबमधील घटनेचा अर्थ लावत आहेत.
- चरणजितसिंग चन्नी, मुख्यमंत्री, पंजाब
केंद्राची चौकशी समिती
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याने एक समिती स्थापन केली आहे. सुरक्षा विभागाचे सचिव सुधीर सक्सेना, आयबीचे संचालक बलबीरसिंह, एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे.